
जळगाव लाईव्ह न्युज । २८ मे २०२२ । महामार्गाचे काम पुर्ण होईपर्यंत व वृक्षारोपणाचे काम पुर्ण होईपर्यंत टोल वसुली करण्यात येवू नये, अशी मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच आठ दिवसाच्या आत टोल वसुली बंद करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील मनसेतर्फे देण्यात आला आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले की, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ५३ वरील तरसोद फाटा ते चिखली हद्द ही ६५ किलोमीटर असून या महामार्गावर टोल वसुली ही नशिराबाद हद्दीतील ओरिएंट सिमेंट कारखान्याजवळ सुरू आहे. परंतु पूर्वीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ असताना येथील डेरेदार वृक्षाची कत्तल करण्यात आलेली होती. त्या बदल्यात आत्तापर्यंत वृक्षारोपण न करता आणि राज्य महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असताना संबंधित ठेकेदाराने तसेच शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून राजपत्र मिळून सदरील टोल वसुली सुरू केलेली आहे.
शासन निर्णय नियमानुसार प्रकल्प निविदेच्या एक टक्का एवढी रक्कम वृक्षारोपण करता खर्च दाखवलेला आहे परंतु वस्तुस्थिती मध्ये कुठलेही वृक्षारोपण झालेले नाही. त्यामुळे वृक्षारोपणाचे काम पुर्ण करुन तसेच महामार्गांचे बाकी असलेले काम पुर्ण केल्यानंतरच टोल वसुली करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने जनतेला सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.