जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांचा वाढदिवस यंदा जनसेवा आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त कोणताही दिखाऊपणा न करता समाजातील तळागाळातील घटकांना मदत करण्याचा संदेश देत शहरातील भाजपच्या विविध मंडळांत रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, अन्नदान, शालेय साहित्य वाटप, कामगार महिलांना साडी वितरण आणि गोसेवा असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.

वाढदिवसाचे औचित्य साधून महापौर दीपमाला काळे यांच्या वतीने शाहूनगर येथील गो-शाळेत गाईंना चारा वाटप करण्यात आले. तसेच पांझरा पोळ गोशाळा येथेही गाईंना लापशी आणि चारा देण्यात आला. जिल्हा महानगर भाजपच्या वतीने सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) गरजू लोकांना अन्नदान आणि रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

वृक्षारोपण आणि भव्य आरोग्य शिबिरे
मंडळ क्रमांक ३ मध्ये जितेंद्र चव्हाण यांच्यातर्फे स्वामी समर्थ केंद्र शारदाश्रम येथे, तर शिवाजीनगर येथे माजी नगरसेवक राजेंद्र मराठे व कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण करण्यात आले. जुने जळगाव परिसरात भाजपचे चिटणीस मिलिंद चौधरी व कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. याशिवाय नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या वतीने सिंधी कॉलनी सेवा मंडळासमोर प्रभागातील नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड नोंदणीचे विशेष शिबिर राबवण्यात आले.
निराधार आणि गरजू महिला-मुलांना भोजन व वस्त्रदान
मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष अजित राणे यांच्या वतीने संत गाडगेबाबा निराधार केंद्र (भजगल्ली) येथे ७० महिला व पुरुषांना भोजन देण्यात आले. शासकीय निरीक्षण गृहातील लहान मुलांना नगरसेविका अंकिता पाटील यांच्या वतीने जेवण देण्यात आले, तर भाजप कार्यकर्ते चेतन तिवारी व राहुल लोखंडे यांच्या वतीने गरीब विद्यार्थिनींना कपड्यांचे वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात दत्त मंदिर (सद्गुरु नगर) येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीतूताई परदेशी यांच्या वतीने गरजू कामगार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
पुष्पगुच्छ, बॅनर ऐवजी गरीब विद्यार्थ्यांना वह्या देण्याचे आवाहन
आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त अनावश्यक बॅनरबाजी, जाहिराती आणि पुष्पगुच्छांवर खर्च न करण्याचे आवाहन केले होते. येत्या २१ जून रोजी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना भव्य वह्या वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त वह्या जमा करून भाजप कार्यालय किंवा जी. एम. फाउंडेशन येथे चिटणीस मिलिंद चौधरी यांच्याकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नितीन लड्डा, प्रकाश बालानी, माजी महापौर सीमा भोळे, उज्वला बेंडाळे, विशाल त्रिपाठी, भारती सोनवणे, राहुल वाघ, जयेश भावसार, नितीन इंगळे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











