जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । बैलगाडा शर्यत चालू व्हावी यासाठी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना, चाळीसगावच्या वतीने बैलगाडा मालक, चालक, शर्यतशौकीन यांच्या उपस्थितीत शर्यत चालू होण्यासाठी चाळीसगाव तालुक्याचे शेतकरी पुत्र आमदार मंगेशदादा चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी महाराष्ट्र बैलगाडा शर्यत चालक मालक व शर्यत शौकीन यांच्या मागण्या समजून घेत एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने मी तुमच्या सोबत आहे. केवळ शासन दरबारी यासाठी पाठपुरावा करून थांबणार नसून राज्यभरातील बैलगाडा शर्यत चालक मालक व शर्यत शौकीन यांच्यावतीने दि.११ ऑगस्ट रोजी चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल पॉईंट) येथे आयोजित केलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे आश्वासित केले.

यावेळी चाळीसगाव तालुक्यातील १५० हुन अधिक बैलगाडा शर्यत चालक, मालक, शर्यत शौकीन उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतीच्या परंपरेवरील बंदी उठावी, ही माझी ठोस मागणी राज्य सरकार कडे करणार आहे.
शेतकरी घराण्याची परंपरा जपणारा बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ असुन हा खेळ सुमारे ४०० वर्षे जुना आहे. यामध्ये केवळ बैलगाडी चालकाचा समावेश नसून इतर छोट्या व्यापाऱ्यांचा देखील समावेश आहे. म्हणून बैलगाड्यांची शर्यत ही ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चांगलीच गती प्रदान करु शकते. बैलगाडा शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी दुभत्या जनावरांतील खिल्लार जात काही दिवसात नामशेष होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बैलगाडा शर्यत बंदी मुळे ग्रामीण अर्थकारणाला मोठा फटका बसला आहे. गावच्या ग्रामदेवतेचे यात्रेमध्ये धार्मिक व संस्कृती परंपरा म्हणून बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी आर्थिक उलाढाल होते ती आता ठप्प झाल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.