⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

आमदार चिमणराव पाटलांचे राजकीय निवृत्तीचे संकेत!

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ फेब्रुवारी २०२३ | जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ व अभ्यासू नेते आमदार चिमणराव पाटील व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद पूर्ण जिल्ह्याला माहिती आहेत. पक्षात जेष्ठ असूनही मंत्रीपदाची संधी न दिल्याने आमदार चिमणराव पाटील नाराज आहेत, हे नव्याने सांगायला नको. मध्यंतरी त्यांनी व्यासपीठावरून राष्ट्रवादीचे जाहीर कौतूक केल्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. आता आबांचे नाव पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, जिल्ह्यात त्यांच्या राजकीय निवृत्तीवर चर्चा सुरु झाली आहे. चिमणआबांच्या निवृत्तीचे संकेत त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या शुभेच्छा फलकांमुळे मिळत आहेत. कारण अमोल पाटील यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील शांत व सयंमी राजकीय नेतृत्व म्हणून पारोळा-एरंडोल मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील (आबा) यांची ओळख आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यात आबांचा मोठा वाटा आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. ते तिसर्‍यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. १९९९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेतर्फे चिमणआबा पाटील पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. सन २००४ मध्ये चिमणआबा पाटील यांचा पराभव झाला. सन २००९ च्या निवडणुकीत चिमणआबा पाटील पुन्हा निवडून आले. २०१४ मध्ये चिमणआबा पाटील पराभूत झाले. त्यानंतर २०१९ मध्ये चिमणआबा पुन्हा निवडून आले.

आबा १९९९ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले असले तरी त्याआधीपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात जनता पार्टीपासून झाली. १९७८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात जेडीसीसीच्या माध्यतातून राजकारणाचा श्रीगणेश: केला. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील तत्कालिन दिग्गज नेते भास्कर आप्पा पाटील यांना पराभूत केल्याने भास्कर आप्पांना पराभूत करणारा हा तरुण कोण? याची जास्त चर्चा झाली होती. त्यानंतर आबा सातत्याने जेडीसीसीला निवडून येत आहेत. १९८० मार्केट कमिटी, १९८६ भू विकास बँक, १९९१-९२ राहूरी कृषी विद्यापीठावर असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

राजकीय जीवनात दीर्घ अनुभव असतांनाही पक्षाने त्यांना मंत्रीपदाची एकदाही संधी दिली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते नाराज होते. राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सर्वात प्रथम आमदार चिमणराव पाटील त्यांच्या सोबत होते. बंडखोरीत सुरत येथे त्यांचा समावेश होता, त्यानंतर गुवाहाटी येथे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदे गटाच्या बंडखोरीचे समर्थन करणारी भूमिका विशद केली होती. या शिवाय बंडखोरांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ आमदार असल्याने एकनाथ शिंदे त्यांना मंत्रिपदाची संधी देतील, अशी अपेक्षा होती. मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. पक्षात त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही, अशी खंत त्यांचे समर्थक वेळोवेळी बोलून दाखवतात.

अमोल चिमणराव पाटील हे युवा सेनेत सक्रिय होते. पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी तालुक्याच्या राजकारणावर पकड मिळवली. त्यानंतर जिल्हा बँकेत संचालक म्हणून देखील ते निवडून आले. चिमणआबांच्या प्रचाराची धुरा त्यांच्यांच्या खांद्यावर असते. यामुळे तरुण चेहरा म्हणून त्यांनी स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. गत वर्षी जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अमोल पाटील यांना अध्यक्ष करण्यासाठी चिमणआबा यांनी प्रयत्न केले. मात्र गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. आता गुलाबराव देवकर व व्हाईस चेअरमन श्यामकांत सोनवणे यांनी मंगळवारी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले. यावेळीही अध्यक्ष म्हणून अमोल पाटील यांचे नाव चर्चेत आहे. अशातच अमोल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने जळगाव शहरात लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवर भावी आमदार म्हणून अमोल पाटील यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे चिमणआबा राजकीय निवृत्ती घेवून अमोल पाटील यांना राजकीय वारसदार म्हणून प्रमोट करत असल्याचे बोलले जात आहे.