सत्ताधारी, विरोधकांवर केला प्रहार : अनिल चौधरींची जोरदार टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२४ । राज्यातील परिस्थिती लक्षात घेता सर्वच एकमेकांचे पाय ओढण्यात लागले आहे. त्यामुळे राज्यात आघाडी आणि युतीचे सरकार बनणार नाही आणि परिवर्तन महाशक्ती प्रहारचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही. देवगौडा ७ खासदारांवर पंतप्रधान झाले. आता योग चांगले आहे. सरकार आमचेच आहे आणि सरकार आम्हीच आणणार आहे. बॅट आणि ४ हे सांगते की आपल्याला विजयाचा चौकार मारायचा आहे. येत्या २० तारखेला सर्वांनी अनुक्रमांक ४ आणि बॅट चिन्हासमोरील बटण दाबून अनिल चौधरींनी प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले.
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ आ.बच्चू कडू यांची रावेर येथे भव्य सभा आयोजित केली होती. त्यासभेत त्यांनी महायुती आणि महाआघाडीचा खरपूस समाचार घेतला. सभेला मोठ्यासंख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
अनिल चौधरी १६०० कोटींचा निधी आणणार
अनेक पक्षांच्या ऑफर आल्या मात्र मी सामान्य म्हणूनच राहिलो. कापसाच्या गाठी विदेशात गेल्या आत्ता तर भाव गगनाला भिडले असते. केळी पिकाला भाव मिळत नाही, पीक विमा वेळेवर येत नाही. मधुकर साखर कारखाना बंद पाडला, रस्त्यांची दुरवस्था झाली. शेतीला रस्ते नाही. मोठे उद्योग आले नाही. अनिल चौधरी यंदा आमदार होणारच आहे. माझ्याशी भांडून त्यांनी १६ कोटींचा निधी मिळवला. ते आमदार झाले तर एकच फेरीत १६०० कोटींचा निधी आणतील. त्यानंतर मी दर ६ महिन्यांनी येऊन मतदार संघातील सर्व कामे मार्गी लावणार, असा शब्द आ.बच्चू कडू यांनी दिला.
दोघांच्या हाती सत्ता असताना मसाका बंद पडला : माजी आ.संतोष चौधरी
रावेर-यावल मतदार संघातील महत्वाचे शहर असलेल्या फैजपूर शहरातील मधुकर सहकारी साखर कारखान्यात मी संचालक असताना कामगारांची देणी देण्यासाठी आम्ही रात्री २ वाजेपर्यंत जागे असायचो. जेव्हापासून इथल्या दोन्ही स्थानिक नेत्यांनी त्यात हस्तक्षेप केला त्यानंतर मसाका बंद पडला. फैजपुरची आर्थिक स्थिती आणि उद्योग त्यावर अवलंबून होते आज हजारो तरुण आणि कामगार बेरोजगार झाले. अनिल चौधरी आमदार झाल्यावर अगोदर मसाका सुरू करतील. पिंपरुड फाट्यावर असलेल्या जमिनीच्या बदल्यात मतदारांना आश्वासन देत शेकडो कोटी लुटणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार संतोष चौधरी यांनी केली.
भाजपने तगड्या उमेदवारांना डावलले : अनिल चौधरी
आजवर रावेर, फैजपूर, यावल मतदारसंघाचा विकास रखडलेलाच आहे. मतदारसंघात जाती, धर्माचे राजकारण केले जात आहे. आम्ही कधीही जात पाहिली नाही. इथे उपस्थित सर्व जनताच माझा धर्म आणि जात आहे. मी सेवेचे, कामाचे आणि जिव्हाळ्याचे राजकारण करतो. इथल्या नीच राजकारणामुळे आम्हाला २७ वर्ष त्रास भोगावा लागला मात्र आम्ही खंबीरपणे उभे राहिलो. भाजपचे इथे चांगले उमेदवार तयारीत होते मात्र काही जेष्ठ नेत्यांना कानाखालचा उमेदवार हवा असल्याने त्यांना डावलण्यात आले. काँग्रेसचा उमेदवार तर अजून लहानच आहे. विधानसभेत जायला दम असणारा व्यक्ती हवा असतो, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी यांनी केली.