जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२५ । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली. यामुळे कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून आमदारकिसोबत त्यांचं मंत्रिपद दोन्ही धोक्यात आले आहे.

मुंबई हायकोर्टानं शिक्षेला स्थगिती दिली, तरच कोकाटेंचे मंत्रिपद वाचू शकते. मात्र कोर्टाकडून कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर त्यांचं मंत्रिपद जाणार आहे. त्यामुळे आता कोकाटेंच्या जागी कुणाला मंत्री करणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

अशा स्थितीत, गेल्या वेळी कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर यावेळी मंत्रिपदापासून वंचित राहिलेले अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात महायुतीचे आधीच तीन मंत्री आहेत. त्यानंतर अनिल पाटील यांना संधी मिळाल्यास जळगावमधील मंत्र्यांची संख्या चारपर्यंत पोहोचेल. मात्र, अजित पवार गटाला त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये खान्देशात होऊ शकतो, असे बोलले जात आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







