मनपातील गलथान कारभार
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । विभागीय चौकशी होऊन अंतिम कारवाईसाठी महापालिकेत आलेल्या फाईल गहाळ झाल्याने मनपातील गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. महापालिकेत काही कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती त्यांची विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषारोप सिध्द झाल्याने अंतिम कारवाईसाठी फाईल मनपाच्या अस्थापना विभागात पोहोचल्या होत्या मात्र या विभागातील काही कर्मचाऱ्यांनी फायली गायब केल्या असून दोषी कर्मचार्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रकरण समोर येत आहे.
अधिक असे की, मनपाच्या सात ते आठ कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने वेगवेगळ्या आरोपाखाली कारवाई करत बडतर्फ केले होते. तसेच या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी देखील लावण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्यांची चौकशी अधिकाऱ्यांनी केली, चौकशीत संबंधित कर्मचारी दोषी देखील आढळून आले होते. चौकशी पूर्ण झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर दोष सिद्ध झाल्यामुळे अंतिम कारवाईसाठी सदरच्या फाईली मनपाला सुपूर्द करण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या चौकशी अहवालानुसार दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित होते मात्र मनपाच्या आस्थापना विभागातील काही कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संगनमत करून चौकशीसाठी आलेल्या फाइल गहाळ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार होती त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करता आली नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी फाईल गहाळ केल्या असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा आशयाचे पत्र सामाजिक कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.