जळगाव लाईव्ह न्यूज । नात्यातील ओळखीला आणि विश्वासाला तडा देणारी एक भयंकर घटना चाळीसगाव तालुक्यात समोर आली आहे. आपल्या भावाचा मित्र आणि नात्याने चुलत काका लागणाऱ्या एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी संशयित नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?
संशयित आरोपी हा पीडितेच्या भावाचा मित्र असल्याने त्याचे घरात सतत येणे-जाणे होते. या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने मुलीला मैत्री करण्यास भाग पाडले. काही काळापूर्वी त्याने पीडितेसोबत काही फोटो काढले होते. या फोटोंचा आधार घेऊन त्याने मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “तुझे फोटो व्हायरल करेन,” अशी धमकी देत त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

आरोपी केवळ अत्याचारावरच थांबला नाही, तर त्याने या कृत्याचे व्हिडिओ आणि फोटो काढून पीडितेला वारंवार धमकावणे सुरूच ठेवले. अखेर या नराधमाने पीडितेचे हे खासगी फोटो इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले. हा प्रकार उघडकीस येताच पीडितेने आणि तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून नराधमांना अटक करण्यात आला आहे.












