..तर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केला जाईल ; मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात मात्र पाऊस सुट्टीवर गेला आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. दरम्यान, पिके वाचविण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अशातच कृत्रिम पावसाबाबत राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. पिकांचं फार मोठं नुकसान झालं आहे. दुष्काळसदृष परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे पाणीटंचाईची फार मोठी समस्या उभी राहू शकते. आता कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होऊ लागली आहे. शास्त्रज्ञांशी याबाबत चर्चा सुरु आहे. पोषक वातावरण असेल तर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये याकरता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील वॅार रुममध्ये दुष्काळ नियंत्रण वॅार रुम तयार केलं जाणार आहे. सातव्या मजल्यावरील CM वॅार रुममधून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
सरासरीपेक्षा कमी पाऊस
या भागांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना सरकारकडून केल्या जाणार आहेत. राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे राज्य सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.