मयत शेतकऱ्याच्या वारसांना तात्काळ मदत देण्याचे प्रशासनाला आदेश !
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कडगाव ते जोगलखेडा रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनाला मयत शेतकऱ्याच्या वारसांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिलेत.
संतोष धनगर (वय-५५, रा.कडगाव ता. जळगाव) हे शेतकरी आपल्या पत्नी आणि मुलासह वास्तव्याला होते. शेतीकाम व पशुपालन करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी ते म्हशी चारण्यासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी परत येत असताना जोगलखेडा ते कडगाव रस्त्यावरील पुलाचे काम करण्यासाठी केलेल्या खड्ड्यात त्यांच्या म्हशी गेल्या होत्या.
पाण्यात गेलेल्या म्हशी या गाळात फसल्याने त्यांना काढण्यासाठी संतोष धनगर हे गेले असता, त्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळालनंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन संतोष धनगर यांना खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढले. यावेळी संबंधित ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चांगली कान उघडणी केली. तसेच मयत शेतकऱ्याच्या वारसांना तात्काळ मदत देण्याचे प्रशासनाला आदेश दिलेत.