Jalgaon : पाऊस, वादळात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे निर्देश

जून 8, 2026 3:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसर, रावेर तालुक्यातील अनेक गावे आणि जिल्ह्यातील इतर भागांतील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

GPpanchaname

पालकमंत्र्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्याशी थेट संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अंतुर्ली परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. केळीच्या बागा भुईसपाट झाल्याचे पाहून त्यांनी तातडीने पालकमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि नुकसानीच्या तीव्रतेची माहिती दिली. यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला आदेश जारी केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जिल्ह्यातील ज्या-ज्या भागांमध्ये केळीसह इतर पिकांचे नुकसान झाले असेल, त्या सर्व ठिकाणी तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत. हा अहवाल तातडीने शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, जेणेकरून कोणताही पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही.

पालकमंत्र्यांचा शेतकऱ्यांना धीर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी किंवा ग्रामस्तरीय यंत्रणेशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी. प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून शासनाच्या निकषानुसार मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जाईल.”

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now