जळगाव लाईव्ह न्यूज : ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली. गणेशोत्सवादरम्यान पावसाने सर्वत्र हजेरी लावली. विसर्जनाच्या दिवशी काहीशी उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा तीन ते चार दिवसांनंतर पुन्हा वीज आणि ढगांच्या गडगडाटांसह दमदार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

गुजरातपासून पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवरून पुढील काही दिवस जोरदार पावसाची तीव्रता कमी होईल. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी वीजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
आज (ता. ८) पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील परभणी हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांतही विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज कायम आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पुन्हा दमदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.






