जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । कोरोनामुळे गेल्या १९ महिन्यांपासून भुसावळातून सुटणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या बंद आहेत. यामुळे नोकरी-व्यवसायानिमित्त अप-डाऊन करणाऱ्यांना चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. परंतु आता चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भुसावळ येथून साधारणतः ऑक्टाेबरमध्ये (संभाव्य १० तारीख) तीन पॅसेंजर गाड्यांची जागा मेमू गाडी घेणार आहे. मात्र, यासाठी भाडे पूर्वीप्रमाणे पॅसेंजरचे असेल की एक्स्प्रेसचे आकारले जाईल? याबाबत स्पष्टता नाही.
काेराेनामुळे २२ मार्च २०२० पासून एक्सप्रेस पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे मंत्रालयाने १ जून २०२० पासून काही नियमित गाड्यांना विशेष गाडीचा दर्जा देत प्रवासी सेवेत आणले होते. परंतु भुसावळ विभागात धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या मात्र बंदच ठेवल्या. दुसरीकडे कन्फर्म आरक्षण असेल तरच विशेष गाडीमधून प्रवासाची परवानगी असल्याने सर्वसामान्य जनता, चाकरमान्यांची कोंडी झाली. पासधारकांना देखील विशेष गाड्यांमध्ये प्रवासाला मनाई होती. त्यामुळे सामान्य प्रवाशांचा विचार करून शक्य तेवढ्या लवकर पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू कराव्या, अशी मागणी होती.
मात्र आता भुसावळ येथून तीन मार्गांवर पॅसेंजरऐवजी मेमू चालवण्याचा निर्णय झाला आहे. त्यांचे भाडे पूर्वीच्या पॅसेंजर नुसार की एक्स्प्रेसचे आकारले जाईल? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण, सध्या धावणाऱ्या भुसावळ-सूरत व भुसावळ-नंदूरबार पॅसेंजरसाठी एक्स्प्रेसचे तिकीट आकारले जाते.
मुंबई, कटनी पॅसेंजरला तूर्त पर्याय नाही
भुसावळ येथून साधारणतः ऑक्टाेबरच्या १० तारखेपासून तीन पॅसेंजर गाड्यांची जागा मेमू गाडी घेणार आहे. यात भुसावळ-खंडवा, भुसावळ-देवळाली आणि भुसावळ-बडनेरा अशा तीन मेमू चालवल्या जातील. दरम्यान, कोरोनामुळे पहिल्या टप्प्यात केवळ भुसावळ विभागातच मेमू चालवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कटनी, मुंबई पॅसेंजरला तूर्त पर्याय नसेल.