खरिपाच्या मका पिकावरील लष्कारीळीचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात येण्यासाठी उपाययोजना; काय आहे घ्या जाणून..
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२४ । जळगाव जिल्हयात काही ठिकाणी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव्र दिसुन आहे. कीड ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे, अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट Y आकाराची खूण असते व शरीराच्या शेवटून दुसऱ्या सेग्मेंट वर चौकोनी आकारात चार ठिपके दिसून येतात.
खरीप हंगामात मका पिकावरील लष्कारीळीचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात येण्यासाठी किडग्रस्त पिकांच्या शेताची खोल नांगरणी शक्यतो दिवसा करावी म्हणजे पक्षाद्वारे किडीच्या वेगवेगळ्या अवस्था नष्ट करण्यास मदत होईल. पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे व या किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा वापर करावा. पिकावरील अंडीसमूह तसेच अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात. टेलेनोमस रेमस व ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांचे एकरी ५० हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर ४ ते ५ दिवसांपर्यंत रासायनिक किटकनाशकांची फवारणी करू नये. अॅझेडिरॅक्टीन १५०० पीपीएम किंवा निंबोळी अर्क ५ टक्के ५० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. न्युमोरिया रिलई किंवा मेटा-हायझियम अॅनीसोप्ली या जैविक किटकनाशकांची ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.
या किडीने ग्रस्त झालेली ५ टक्के झाडे आढळून आल्यास कार्बोफ्युरॉन ३ टक्के दाणेदार सीजी ३३ कि.ग्रॅ./हेक्टर किंवा फोरेट १० टक्के दाणेदार सीजी १० कि.ग्रॅ./हेक्टर ही किटकनाशके जमिनीत ओलावा असताना फेकीव पद्धतीने वापर करावा आणि दाणे जास्तीत जास्त पोंग्यामध्ये पडतील याची काळजी घ्यावी. डायमिथोयेट ३० टक्के ईसी १३ मि.ली. किंवा थायोमेथोक्झाम १२.६ टक्के लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड सी ३ मि.ली. किंवा क्लोरॅट्रॅलीनीप्रोल १८.५ टक्के एस सी ३ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी किटकनाशकांची करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क कृषि सहाय्यक / कृषि पर्यवेक्षक / मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी टोल फ्री क्र.: १८०० २३३ ४००० वेब साईट: www.krishi.maharashtra.gov.in यावर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.