⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ नोव्हेंबर २०२१ । मुक्ताईनगर येथील भाजपच्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांना पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने, सोमवारी रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अपात्र घोषित केले.

सविस्तर असे की,   मुक्ताईनगर येथील गिरीश चौधरी यांनी नगराध्यक्षांच्या निवडीला जिल्हाधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम ५१-१ब अन्वये आव्हान दिले होते. निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र भरतांना सहा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केले होते. नंतर शासनाने यात सुधारणा करून सहा महिन्याच्या मुदतीत बदल करून बारा महिन्यांची मुदत करण्यात आली होती. नगराध्यक्षा तडवी २० जुलै २०१८ रोजी निवडून आल्या होत्या. त्यांनी २० जून २०१९ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित होते.

मात्र, त्यांनी प्रमाणपत्र मुदतीनंतर सादर केले. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमानुसार त्यांना अपात्र घोषित केले. गिरीश चौधरी यांच्यातर्फे औरंगाबाद येथील अध. भाऊसाहेब देशमुख यांनी कामकाज पाहिले.

लवकरच उच्च न्यायालयात आव्हान देणार

मी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आदिवासी महिला म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर निवडून आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी अजूनही त्यांचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्या सर्वांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी दिली.