⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

जुन्या खेडी रस्त्याची महापौरांकडून पाहणी, नागरिकांची गतिरोधकांची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । शहरातील रस्त्यांच्या कामावर अचानक भेट देत पाहणी करण्याचा सपाटाच महापौर जयश्री महाजन यांनी सुरु केला आहे. महापौरांनी शुक्रवारी जुना खेडी रोड परिसरातील रस्त्याला भेट देत अचानक पाहणी केली. परिसरातील नागरिकांनी स्वच्छतेबाबत तक्रार केल्याने महापौर जयश्री महाजन यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्याबाबत सूचना केल्या.

जळगाव शहरात रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. महापौर जयश्री महाजन यांनी रस्त्यांच्या कामाला अचानक भेट देत कामाची गुणवत्ता तपासायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी नेहरू चौक ते रेल्वे स्थानक पाहणी करण्यात आली होती. मनपा अधिकाऱ्यांकडून कामाची गुणवत्ता देखील तपासण्यात आली होती. तसेच कामाचे थर्ड पार्टी ऑडिट झाले कि नाही हे देखील महापौरांनी विचारले होते.

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मोहन टॉकीज ते जुना खेडी रोड परिसरासाठी तब्बल सव्वादोन कोटींचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून शुक्रवारी महापौर जयश्री महाजन यांनी कामाला भेट देत पाहणी केली. प्रसंगी भरत सपकाळे, मनपा अभियंता जितेंद्र रंधे, फारुख शेख, मक्तेदार प्रतिनिधी आदी उपस्थित होते. महापौरांनी काम गुणवत्तापूर्ण होते कि नाही याची स्केलद्वारे मोजणी करून खात्री केली.

सागर नगर परिसरातील नागरिक त्याठिकाणी उपस्थित असल्याने महापौरांनी त्यांच्याशी देखील चर्चा करून माहिती घेतली. रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांची काही तक्रार नव्हती मात्र घराच्या पायरीपर्यंत रस्ता असावा असे नागरिकांनी सांगितले. तसेच परिसरात गटारी स्वच्छ केल्या जात नाही. साफसफाई करणारे कर्मचारी येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. महापौर जयश्री महाजन यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून स्वच्छतेच्या सूचना केल्या. जुना खेडी रोड रहदारीचा आणि प्रमुख रहिवासी रस्ता आहे. जवळच शाळा असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा देखील असते, त्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांनी केली. महापौर जयश्री महाजन यांनी मनपा अभियंत्यांशी चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

पहा व्हिडीओ प्रक्षेपण :