जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात नाले, गटारी तुंबून घरांमध्ये पाणी शिरल्याचे प्रकार घडले आहेत. भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे यांनी सोशल मीडियावर सत्ताधारी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला असून महापौर, उपमहापौरांवर निशाणा साधत डुकरे आणि कोंबड्यांपासून वेळ मिळाला असेल तर शहराकडे लक्ष द्या असा टोला त्यांनी लगावला आहे.
जळगाव शहरात काल रात्री दहा वाजेपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गटारी, नाले तुडुंब भरून वाहत होते. शहरातील काही परिसरात काही दिवसांपासून साफसफाई होत नसल्याने गटारी तुंबल्या असून त्यामुळे काल झालेल्या पावसाचे पाणी रस्त्यांवर वाहून घरांमध्ये शिरण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले.
भाजप महिला आघाडीच्या यांनी रात्री दीड वाजता सोशल मीडियात काही फोटो शेअर करत सत्ताधारी शिवसेनेचा चांगला समाचार घेतला. महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर टीका करत डुक्कर आणि कोंबड्यांपासून वेळ मिळाला असेल तर जरा गटारीकडे लक्ष द्या अशी मागणी त्यांनी केली. घरांमध्ये पाणी घुसत असून लोक जागे आहेत आणि तुम्ही काय झोपा काढा? असा प्रश्न विचारत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
रविवारची सकाळ उगवून सूर्य मध्यावर येण्याची वेळ झाली असून अद्यापही एकही सत्ताधारी पदाधिकारी कोणत्या प्रभागात फिरकला देखील नसल्याचे चित्र आहे.