⁠ 
सोमवार, मे 6, 2024

Mars Transit : रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला ‘मंगळ’ पुन्हा बदलणार रास, ‘या’ राशीच्या लोकांवर होईल परिणाम!

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । अंतराळात भ्रमण करणाऱ्या प्रत्येक ग्रहाचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होत असतो. आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती बदलल्यावर आयुष्यात काही चढउतारांना आपल्याला सामोरे जावे लागते. मंगळाचे संक्रमण रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला बदलणार असून त्याचा मेष राशी सोडून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. मंगळाच्या संक्रमणाने सर्वांवरच त्याचा परिणाम जाणवणार असून त्याचीच माहिती आम्ही आपणास देत आहोत.

ज्योतिषशास्त्रात, मंगळ हा लाल रंगाचा ग्रह मानला जातो. मंगळ ग्रह देवता सामान्यतः तापट समजली जात असले तरी प्रत्यक्षात मंगळ धैर्य, पराक्रम, शौर्य, ऊर्जा, नेतृत्व, भावंड आणि बऱ्याच गोष्टींचा दाता आहे. शेती, रेती, मातीशी संबंध येणाऱ्या प्रत्येकाचा मंगळाशी थेट संबंध असतो. मंगळ वृश्चिक आणि मेष राशीचा स्वामी आहे. त्याच वेळी, मकर ही त्याची उच्च रास असून कर्क ही त्याची दुर्बल रास आहे. याशिवाय, जर ग्रहांबद्दल बोलायचं झाल्यास, ग्रहांच्या वर्तुळानुसार मंगळ हा सूर्य आणि चंद्राचा मित्र आहे, परंतु शुक्राशी त्याची शत्रुता आहे.

एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करायला मंगळाला ४५ दिवस लागतात. म्हणजेच, मंगळ राशी चक्रावर एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे ४५ दिवस लागतात आणि नंतर तो दुसऱ्या राशीत जातो. आता मंगळ पुन्हा एकदा आपली मेष राशी सोडेल आणि १० ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ९ वाजून ४३ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीतील मंगळाचे संक्रमण संपूर्ण देशात अनेक बदल घडवून आणेल, ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होईल.

वृषभ राशीच्या लोकांवर मंगळाचा प्रभाव

१० ऑगस्ट रोजी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल, या स्थान बदलामुळे मंगळ लोकांच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित परिणाम होतील. तसेच संक्रमणामुळे वृषभ राशीचे लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतील. जर तुम्हाला रागाशी संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही त्यावरही नियंत्रण ठेवू शकाल. राशिचक्रावर वृषभ रास ही दुसरी रास आहे आणि या स्थितीत जेव्हा मंगळ वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य प्रस्थापित होते. यासोबतच वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या धाडसामुळे आणि चांगल्या वाणीमुळे आर्थिक लाभही होणार आहे.

‘या’ राशीच्या लोकांना होईल फायदा
वृषभ : या संक्रमण काळात तुम्हाला परदेशात जाण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या आईचे प्रेम मिळेल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल. काही लोकांना मालमत्ता विकून किंवा खरेदी करून नफा मिळेल. तसेच, जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

कर्क : मंगळ तुमच्यासाठी शुभ राहणार असल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे संक्रमण कार्य करेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत फळाला येईल आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्येही उर्जेने पुढे जाताना दिसाल. जर तुम्ही विवाहित असाल तर मंगळाच्या कृपेने तुमच्या जोडीदाराला चांगली बढती मिळेल, ज्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर चांगला परिणाम होईल.

वृश्चिक : मंगळ तुमच्या कामात किंवा तुमच्या क्षेत्रात सर्वात अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता निर्माण करत आहे. विशेषत: तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर या काळात तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. यावेळी, तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनातही तुमचा समजूतदारपणा दाखवून तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते सुधारण्यास सक्षम असाल.

मकर : या टप्प्यामुळे तुमची ऊर्जा पातळी अचानक वाढेल. हे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करताना त्यातून सर्वोत्तम मिळविण्यास मदत करेल. जर तुम्ही तुमच्या पगारवाढीची किंवा पदोन्नतीची वाट पाहत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येईल. विवाहित लोक त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील.

(बातमीत देण्यात आलेली माहिती ज्योतिषशास्त्रातील गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मंगळाच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात अनेक बदल घडतील. अनेकांच्या जीवनात उलथापालथ होईल. काहींना शुभ संकेत आहे काहींना खडतर प्रवास आहे. ज्या राशींना खडतर प्रवास आहे त्यांनी मंगळग्रह मंदिरात येऊन भक्ती करावी तसेच अभिषेक करावा असे मार्गदर्शन श्री मंगळदेव ग्रह मंदिरातील पुरोहितांनी दिले आहे.