जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेवून ये अशी मागणी करून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाण, शिवीगाळ करून मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पतीसह सासू, नणंद, दीरांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, एरंडोल शहरातील मुल्ला वाडा येथील रहिवासी शाहिस्ता इम्रानखाँ पठाण (वय २६) ह.मु. शाहूनगर, नुरानी मशिद जवळ, जळगाव यांचा विवाह २ मार्च २०१४ रोजी इम्रानखाँ लुकमानखान यांच्याशी झाला होता. शाहिस्ता पठाण यांना तीन अपत्ये आहेत. विवाहानंतर वर्षभर शाहिस्ता यांना पती व सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर लग्नात आमचा मानपान झाला नाही, घरगुती सामान कमी दिला, तुला काम येत नाही असे बोलून शाहिस्ता मारहाण करून मानसिक त्रास दिला. तसेच मोटरसायकल घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपयांच्या मागणीसह सासरच्या लोकांनी तिला विविध प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली. शाहिस्ता यांच्या माहेरची परीस्थिती गरिबीची असल्याने तसेच तीन लहान मुले असल्यामुळे तिने हा त्रास सहन केला. विवाहितेची आई जैब्बूनीसाबी ह्या जळगाव येथे गेल्या असता सासरच्या लाेकांनी शाहिस्तेसह तिच्या आईलाही मारहाण केली. तसेच पती इम्रान खान यांनी तोंडी तलाक दिला. याबाबत शाहिस्ता यांच्या तक्रारीवरून पती इम्रान खान पठाण, सासू बानोबी लुकमानखान, नणंद शबाना आरिफ खान, शमीम रईस खान, दीर शाहरुख खान, सर्व रा.शाहूनगर, जळगाव आणि रुबिना इम्रानखान, रा.शिवणा,ता.सिल्लोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास हवालदार अनिल पाटील, सुनील लोहार करत अाहेत.