⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Mansoon Update : अरबी समुद्रात खोळंबला मान्सून, पाऊस पुन्हा लांबणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय. केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, हा अंदाज हुकण्याची शक्यता आहे. कारण मागील तीन दिवसापासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच आहे. त्यामुळे पुढच्या टप्याचा प्रवास खोळंबला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी जूनचा पहिला आठवडा उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाचा मान्सून १० दिवसआधीच अंदमानात दाखल झाला होता. तर तो 27 मे पर्यंत केरळमध्ये तर 5 जूनपर्यंत कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून मान्सून श्रीलंकेच्या किनारपट्टीवर अडकला आहे. त्यामुळे येत्या 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनला विलंब लागण्याची शक्यता आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यानंतर कोकणमार्गे मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे मान्सूनचे आगमन काहीसे लांबले आहे. दरम्यान, आज पहाटे मुंबई आणि आसपासच्या परिसारता पाऊस झाला. त्याला मान्सून म्हणता येणार नाही. तो मान्सून पूर्व पाऊस आहे. मान्सूनला जरी विलंब लागणार असला तरी यंदा सकारात्मक पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र. मान्सून सध्या श्रीलंकेच्या किनारपट्टीवर अडकला असल्याने भारतात मान्सून आगमनाला विलंब लागण्याची शक्यता आहे.