मंगळवार, सप्टेंबर 12, 2023

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । गेल्या नऊ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज पाटील जरांगे यांची प्रकृती काहीशी खालावली आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. तसेच बोलण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपोषणस्थळी जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आल्याने त्यांच्याभोवती कार्यकर्ते जमले आहेत. तर जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची वार्ता पसरल्याने जालना, औरंगाबादसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत. त्यामुळे आज अंतरवाली सराटी येथे आंदोलकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यावरून राज्यातील वातावरण तापले होते. काल मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या शिष्टमंडळाला आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज पाटील जरांगे यांनी चार दिवसांची मुदत दिली आहे. जरांगे उपोषणावर ठाम असून चार दिवसांत जीआर न निघाल्यास पाण्याचाही त्याग करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले होते. आता जरांगे यांची प्रकृती काहीशी खालावली आहे.

शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आणखी वेळ कशाला पाहिजे. चार दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी राज्य शासनाच्या शिष्टमंडळासमोर मांडली होती. आता जरांगे यांची हेल्थ अपडेट आली आहे.