खडसेंना धक्का देणारे आ.मंगेश चव्हाणच होणार दूध संघाचे नवे अध्यक्ष?
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांचा निवडणुकीत पराभव करत जायंट किलर ठरलेले चाळीसगावचे आमदार व भाजप नेते मंगेश चव्हाण हे दूध संघाचे नवे अध्यक्ष होऊ शकतात अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. असेही म्हटले जात आहे.
निवडणूक झाल्या झाल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही अध्यक्षाच्या रेसमध्ये नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. त्यातच दूध संघाच्या अनेक चौकशादेखील सध्या सुरू असल्याने, या चौकशांच्या अनुषंगाने भाजपकडून मंगेश चव्हाण यांनाच चेअरमनपदाची संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. मंगेश चव्हाण हे गिरीश महाजन व गुलाबराव पाटील या दोन्ही नेत्यांच्या जवळचे मानले जातात. याच बरोबर अनेक संचालकांचादेखील चव्हाण यांच्या नावाला समर्थन आहे. पर्यायी आगामी काळात मंगेश चव्हाण यांची दूध संघाच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते.
जिल्हा दूध संघात चेअरमनपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. चेअरमनपदासाठी जरी चव्हाण यांचे नाव आघाडीवर असले तरी हे पद किती वर्षांसाठी व शिवसेना शिंदे गटाचा यामध्ये कशाप्रकारे समावेश केला जाईल, याबाबतचा निर्णय गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
दूध संघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर लागलीच सोमवारी मंगेश चव्हाण व संचालक अरविंद देशमुख यांनी दूध संघात प्रवेश केला. सायंकाळी दूध संघाच्या विविध विभागात जाऊन कामांचा आढावा घेतला. महिन्याच्या १० तारखेपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलांची अदायकीही केली जात असते. याबाबतदेखील चव्हाण यांनी माहिती घेतली. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या बिलांची अदायकी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांच्या बिलांची अदायकी बुधवारपर्यंत देण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या.