मोठी कारवाई : तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांच्यासह चौघे निलंबीत
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । कोरोनाच्या आपत्तीत विविध वस्तूंच्या खरेदीत केलेल्या अपहारामध्ये तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांच्यासह चौघांना निलंबीत करण्यात आले असून यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का ? अशी चर्चा शहारत आहे.
कोरोनाची आपत्ती असतांना विविध अत्यावश्यक उपकरणांच्या खरेदीत घोळ झाल्याचे आरोप आधीच करण्यात आले होते. जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी चौकशीसाठी आंदोलन देखील केले होते. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीत जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक सुधाकर दगडू चोपडे, अभिलेखापाल मिलिंद निवृत्ती काळे व लेखा अधीक्षक हरिपाठ वाणी यांना नियमबाह्य व अवास्तव खरेदीला मंजुरी दिल्याप्रकरणी दोषी ठरवत निलंबित करण्यात आले होते. यानंतर याच प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.
यांना करण्यात आले निलंबित
आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी केलेल्या चौकशीत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबूलाल बालेला तर प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. सुनील बन्सी व प्रभारी प्रशासकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय डॉ. संदीप पाटील या चौघांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.