⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | वाणिज्य | शेअर बाजारात महिनाभरातील ४,७०० अंकांच्या घसरणीमागे ‘ही’ आहेत प्रमुख चार कारणे

शेअर बाजारात महिनाभरातील ४,७०० अंकांच्या घसरणीमागे ‘ही’ आहेत प्रमुख चार कारणे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : शेअर मार्केटमध्ये १३ एप्रिल २०२२ ते १३ मे २०२२ या एक महिन्यात मोठी उलथापालथ पहायला मिळाली. १२ एप्रिलला सेन्सेक्स ५८,३३८ अंकांवर होता मात्र महिनाभरातच सेन्सेक्स तब्बल ४,७०० अंकांनी कोसळून ५३,५७६ पर्यंत खाली आला आहे. त्यातही या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराने सुमारे ७०० अंकांनी उसळी घेतली होती यामुळे काही प्रमाणात नुकसान कमी झाले.
गत आठडाभरात सेन्सेक्स सुमारे तीन हजार अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या दिवसांमध्ये गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण असून आले, त्यामुळे शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढला होता. ही स्थिती केवळ भारतातच नसून जागतिक स्तरावर सर्वच शेअर मार्केटमध्ये कमी अधिक फरकाने ही स्थिती दिसून येत होती. शेअर बाजारात होरपळलेल्यांना शुक्रवारी किंचितसा दिलासा मिळाला. शेअर बाजारात होत असलेल्या या मोठ्या चढउतारामागे कोणती कारणे आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मध्यवर्ती बँकांकडून दर वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात मुख्य रेपो रेट ०.४० टक्क्यांनी वाढवल्यानंतर शेअर बाजराची घसरगुंडी सुरु झाली. याला आरबीआयलाच कारणीभुत मानता येणार नाही कारण त्याचवेळी यूएस फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ इंग्लंडनेही आपले व्याजदर वाढवले. भारतासह जागतिक स्तरावर वाढत्या महागाई दरांमुळे, बहुतांश केंद्रीय बँकांनी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ केली आहे. याचा विपरित परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.

रशिया-युक्रेन युध्द

रशिया आणि युक्रेन युध्द जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असून ते नजिकच्या काळात संपण्याची चिन्हे दिसत नाही. या युध्दामुळे जागतिक व्यापार साखळी विस्कळीत झाली आहे. कच्चे तेल महागल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. रासायनिक खते, केमिकलच्या किंमतीही वाढत असल्याने कमोडिटी मार्केट विस्कळीत झाले आहे. याचेही विपरित पडसाद शेअर मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत.

वाढती महागाई

देशांतर्गत महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने किरकोळ गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऐवजी मार्केटमधून पैसे काढून घेण्यास प्राधान्य देत आहे. आजवरचा अनुभव पाहता जेंव्हा जेंव्हा महागाई वाढते तेंव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून घेतात. परिणामी विक्रीचा मारा सुरु होतो व शेअर बाजार अजून कोसळतो. कोरोना आणि लॉकडाऊनपासून देशाचे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. अर्थचक्र जोपर्यंत रुळावर येत नाही तोपर्यंत ही अस्थिरता कायम राहण्याचा अंदाज अर्थतज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा

डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली आहे. रुपयामध्ये आलेल्या घसरणीमुळे परदेशी गुंतवणुकदार शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेत आहेत. संस्थात्मक विदेशी गुंतवणूकदार हे शेअर बाजारातील प्रमुख खेळाडूंपैकी एक असतात. बातम्यांनुसार, एप्रिल २०२१ पासून संस्थात्मक विदेशी गुंतवणूकदारांनी २० बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले आहेत. स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की जानेवारीमध्ये संस्थात्मक विदेशी गुंतवणूकदारांनी जानेवारी मध्ये ४.४६ बिलियन डॉलर्स, फेब्रुवारीमध्ये ४.७१ बिलियन डॉलर्स, मार्चमध्ये ५.३८ बिलियन डॉलर्सचे शेअर्स विकले असून अजूनही विक्रीचा मारा सुरु आहे. मे २०२२ च्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास ६४१७ कोटी रुपये बाजारातून काढले आहेत. तर, २०२२ मध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मागे घेतली आहे. यामुळेही भारतीय शेअर बाजाराला घसरगुंडी लागली.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.