जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२६ । मागच्या दोन तीन दिवसापासून जळगावसह राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असून काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. राज्यात अद्याप अवकाळी पावसाचं सावट कायम असून आज देखील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडाकटाडासह जोरदार पाऊस हजेरी लावेल. या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरुवारी वाशीम ३८.४ अंश, जळगाव येथे ३७ अंश, अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली, तर धुळ्यात नीचांकी 15 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
खान्देशात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाने हजेरी लावली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गारपीठ झाली, नंदुरबारातील धडगाव तालुक्यात सातपुड्यातील बहुतेक गावांमध्ये गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास जोरदार पाऊस झाला; तर, जळगावातील गिरणा पट्टयातील चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्याला अवकाळी पावसाने गुरुवारी तडाखा दिला. धडकी भरविणाऱ्या वादळी पाऊस अणि विजांच्या कडकडाटाने शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत. या पावसाने ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरासोबत लिंबू आणि केळी बागांना फटका बसला आहे.







