सावधान! महाराष्ट्रवर अवकाळी पावसाचे सावट, जळगावात कशी राहणार स्थिती?

फेब्रुवारी 25, 2026 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२६ । फेब्रुवारीच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे थंडी ओसरून उन्हाचा चटका वाढू लागला असताना त्यातच राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. मागच्या दोन दिवसात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झाले. दरम्यान, आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता आहे.

rain

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता वर्तविली असून त्याच पार्श्वभूमीवर पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

Advertisements

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भात कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. अशातच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली. आज विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर येथे वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलका पाऊस, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Advertisements

उन्हाळा सुरु होण्यापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यामध्येच आता रब्बीतील पिक शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले असतानाच अवकाळी पाऊस झाला, लगेचच पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातंय.

जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडी ओसरली असून उन्हाचा पारा वाढल्यानं उकाड्यात वाढ झाली आहे. मागच्या दोन तीन दिवसापासून सकाळीच आकाशात ढगांची गर्दी झाल्याने नागरिकांत अवकाळी पाऊस व गारपिटीची धाकधूक निर्माण झाली होती; मात्र हे ढग पावसाचे नसून ते सिरोक्यूमुलस प्रकारचे ढग आहेत. त्यामुळे पाऊस, गारपिटीची शक्यता नाहीय. मंगळवारी जळगावचे कमाल तापमान ३५.८ तर किमान तापमान १६ अंश इतके होते. दरम्यान, आज २५ ते २६ फेब्रुवारीदरम्यान जळगावात आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर २७ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ढगाळ वातावरण कमी होऊन आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहील. दरम्यान, कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असल्याने उकाडा वाढणार.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now