जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२३ । राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून यामुळे बळीराजा चिंतेत आहे. आता पावसाचे पुन्हा कमबॅक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्यात या आठवड्यात पाऊस ‘कमबॅक’ करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
सध्या हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा प्रभाव समान असल्यामुळे ‘अल निनो’चा सध्या प्रभाव दिसून येत नाही. आयओडी पॉझिटिव्ह राहण्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या १९ तारखेपासून नैऋत्य मॉन्सूनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. परिणामी ऑगस्टच्या शेवटी चांगल्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढून १८ किंवा १९ ऑगस्टपासून किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. साधारण २५ ऑगस्टपासून राज्यात बहुतेक भागात हलका पाऊस सुरू होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसळीकर यांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात १८ ते २४ आणि २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात आणि शेजारील तसेच शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे. पण स्पष्टता नाही असं ते म्हणाले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टला पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.