जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यात गेल्या १४ दिवसापासून घडत असलेले सत्तांतर नाट्य साऱ्या जगाने पहिले. शिवसेनेतील तब्बल ४० आमदार फोडत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपच्या साथीनं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार याचा अंदाज देखील कुणी बांधलेला नव्हता. राज्यात स्थिर सरकार येणार कि नाही? कुणाची वर्णी लागणार? विधानपरिषद निवडणुकीपासून सुरु असलेले हे सत्तांतर नाट्य कधीपर्यंत चालणार? या विषयी कुणीही ठोसपणे सांगू शकत नव्हते. राजकीय तज्ज्ञ विश्लेषक देखील केवळ अंदाजांचे पूल बांधत होते. सर्व राजकीय घडामोडीत एक व्यक्ती आपल्या अंदाजावर ठाम होती ती म्हणजे पाचोऱ्याचे गजानन जोशी गुरुजी. ४ जुलै रोजी स्थिर सरकार येणार हे त्यांनी ठामपणे सांगितले होते आणि जवळपास ते खरे ठरलं.
राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde in Pachora) यांनी काही महिन्यांपूर्वी गुप्तता पाळत पाचोरा दौरा केला होता. प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेत पाचोर्यातील गजानन जोशी गुरुजींना एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा हात दाखवला होता. एकनाथ शिंदे यांनी भविष्य जाणून घेतले असता नशिबात राजयोग असल्याचे भविष्य जोशी गुरुजींनी व्यक्त केल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ने गेल्या आठवड्यात जोशी गुरुजी यांची मुलाखत घेतली असता त्यांनी राजयोगचा पुनरुच्चार केला आणि ४ जुलैपर्यंत मोठी घडामोड घडणार असे भाकीत देखील वर्तविले होते. जोशी गुरुजींनी सांगितलेला शब्द न शब्द खरा ठरला असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत.
हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की.. असे शब्द ऐकून गुरुवारी अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांना तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले यावर विश्वासच बसत नव्हता. अवघ्या काही तासाअगोदर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असे चित्र असताना राज्यपालांच्या भेटीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले. स्वतः मंत्रिमंडळ बाहेर राहणार असल्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली मात्र काही तासातच वरिष्ठांच्या आदेशाने उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यात अवघ्या दोन तासात घडलेल्या या घडामोडींनी अनेकांची झोप उडाली, कितीतरी तज्ज्ञ विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरले. तर्कवितर्क तर बाजूलाच पडले.
हे देखील वाचा : भाजपचा मास्टर स्ट्रोक : धर्मवीरांचे एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे बंड गेल्या १३ दिवसापासून नागरिक अनुभवत होते. घडामोडीत शिंदे गटाचे काय होणार? कसे होणार? मुख्यमंत्री कोण? भाजप कुठे असणार? याचे केवळ तर्कवितर्क बांधले जात होते मात्र एकच व्यक्ती अशी होती जी एकनाथ शिंदे यांच्या नशिबात राजयोग असून तेच मुख्यमंत्री होणार असे सांगत होते. ती व्यक्ती म्हणजे पाचोरा येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिराचे गुरुजी गजानन जोशी महाराज. ऑक्टोबर महिन्यात एकनाथ शिंदे अचानक पाचोरा आले होते. शिंदे यांच्या दौऱ्याबाबत प्रशासन देखील अनभिज्ञ होते. पाचोरा-भडगाव येथील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगितले जात असले तरी या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
पाचोऱ्यातील श्रीराम मंदिराला भेट देत एकनाथ शिंदे यांनी पूजा विधी देखील केला होता. शिंदे यांच्यासोबत तेव्हा आ.किशोर पाटील, मुकुंद बिल्दीकर, तत्कालीन नगराध्यक्ष संजय गोहिल हेच होते. शिंदे केव्हा आले आणि केव्हा रवाना झाले हे अनेकांना कळले देखील नसले तरी एकनाथ शिंदे यांनी गजानन जोशी गुरुजींना आपला हात दाखवीत भविष्य जाणून घेतले होते हे मात्र निश्चित. एकनाथ शिंदे यांच्या नशिबात लवकरच राजयोग असल्याचे संकेत जोशी गुरुजींनी दिले होते. ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ने थेट पाचोरा धडक देत श्रीराम मंदिरातून गजानन जोशी गुरुजींकडून एकनाथ शिंदे व सरकारबाबत मत जाणून घेतले. ग्रहांची सध्याची परिस्थिती लक्षात घेता लवकरच मोठी घडामोड घडणार असून ४ जुलैपर्यंत चित्र स्पष्ट होईल असे ते म्हणाले होते. एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड यशस्वी होऊन त्यांच्या नशिबात राजयोग असल्याने तेच मुख्यमंत्री होणार असे संकेत देखील जोशी गुरुजींनी दिले होते.
हे देखील वाचा : पाचोऱ्याच्या गुरुजींचे भविष्य ठरले खरे, शिंदेंच्या नशिबात आला राजयोग!
राज्यातील घडामोडींवर दररोज माध्यमातून काही ना काही अंदाज वर्तविले जात होते. काही दिग्गज राजकारणी वेगवेगळे अंदाज बांधत होते तर राजकीय विश्लेषक सरकारचे काय होणार याबाबत आपले मत व्यक्त करीत होते. मध्यंतरी तर सरकार स्थापनेची तारीख ठरली ३ जुलै, सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत बंडखोर अपात्र ठरणार असे काही अंदाज व्यक्त होत होते. काहींनी तर राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे देखील भाकीत व्यक्त केले होते. बंडखोर नॉट रिचेबल झाल्यानंतर ते केव्हा परतणार, काय होणार हे कुणीच सांगू शकत नव्हते. परंतु पाचोऱ्याचे गजानन जोशी गुरुजी यांनी अचूक अंदाज बांधला होता.
राज्यातील चित्र दि.३० रोजी स्पष्ट झाले आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. राज्यात ४ जुलै रोजी स्थिर सरकार येणार असे जोशी गुरुजींनी सांगितले होते. योगायोग असा कि आषाढीच्या पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि दोन दिवसांनी विशेष अधिवेशनात शिंदे गटाला आपले बहुमत सिद्ध करायचे होते. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या दिवशी म्हणजेच ४ जुलै रोजी सर्व बंडखोर आमदार मुंबईत परतले आणि शिंदे गटाने आपले बहुमत सिद्ध केले. इतकंच काय तर शिवसेना गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांनाच मान्यता मिळाली. सर्वोच्च न्यायालयात अद्याप आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कामकाज सुरु असून त्यावर ११ जुलै रोजी कामकाज होणार आहे. असे असले तरी दि.४ जुलै रोजी स्थिर सरकारचे चित्र जवळजवळ निश्चित झाले आहे. पाचोरा येथील गजानन जोशी गुरुजींनी वर्तविलेले भविष्य खरे ठरले आहे.
राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात व्हायरल होत असलेला पंचांगचा एक कागद आणि जोशी गुरुजींनी व्यक्त केलेले भविष्य यामुळे ज्योतिषशास्त्रावरील विश्वास अधिक दृढ होईल हे निश्चित. सर्वोच्च न्यायालयाच्या दि.११ रोजीच्या निकालानंतर दि.१३ जुलै रोजी मंत्रिमंडळ स्थापना केली जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
पहा खास व्हिडीओ मुलाखत :