⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

Maharashtra Crisis : एकनाथ शिंदे गट धोक्यात, भाजपला शिंदे गटाच्या मतांची आवश्यकता नाही!

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । राज्यातील मविआ सरकार कोसळण्याची स्थिती निर्माण झाली असून राज्यावर गेल्या आठ दिवसांपासून राजकीय अस्थिरतेचे ढग जमले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवरील संकट अधिक गडद झालं आहे. उद्या दि.३० जून विशेष अधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून शिवसेना न्यायालयात गेलेली आहे. न्यायालयाचा निर्णय कुणाच्या बाजूने असणार हे अद्याप बाकी असल्याने बहुमत कोण सिद्ध करणार याची उत्सुकता लागून आहे. सात अपक्ष आमदारांनी पत्रं लिहून सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं जाहीर केलं आहे, अशी माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. दरम्यान, सध्याचे संख्याबळ लक्षात घेता उद्या बहुमत सादर करताना भाजपला एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची आवश्यकता नसल्याची माहिती आहे.

राज्यातील राजकीय परिस्थिती प्रचंड अस्थिर झाली असून त्यात आत राज्यपालांनी उडी घेतली आहे. भाजपच्या पत्रानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. उद्या दि.३० रोजी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अधिवेशन संपवावे लागणार आहे. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर आता संख्याबळाचा खेळ सुरू झाला आहे. सर्व पक्षांकडून आपल्या बळाची चाचपणी केली जात आहे. सध्या शिवसेनेकडे ५५ आमदार आहेत. त्यातील ३९ आमदारांनी बंड केले असून ठाकरे सरकारमधील दोन आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राष्ट्रवादीचे दोन आमदार देखील तुरुंगात आहेत. दोघांनी बहुमत चाचणीत सहभागासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. संख्याबळानुसार ४३ आमदार आज आघाडीच्या हातून निघून गेले आहेत. तसेच प्रहारचे दोन आमदार आणि इतर ७ अपक्ष आमदारांनीही शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. त्यामुळे एकूण ५० आमदारांची आघाडीला कमतरता भासणार आहे.

शिवसेनेतून ३९ आमदारांनी बंडखोरी केली असली तरी शिवसेनेकडून १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाने दि.११ जुलैपर्यंत आमदारांना दिलासा दिला आहे. दुसरीकडे शिंदे गटाने तांत्रिक कारण पुढे देत शिवसेनेची कृती चुकीची आहे असं म्हटले आहे. न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असले तरी शिंदे गटाकडे शिवसेनेचे ३९ आमदार आहेत म्हणजे शिंदे गटाकडे दोन तृतियांश मते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नसल्याची चर्चा आहे. सध्या तरी शिंदे गट वेगळा गट स्थापन करून किंवा स्वतःच शिवसेना असल्याचे सांगत भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून त्यादृष्टीने तयारी सुरु करण्यात आली असून मनसे आणि अपक्षांशी संपर्क केला जात आहे.

भाजपकडे सध्या स्वतःचे १०६ आमदार असून शिंदे गटाचे ३९ तर अपक्ष २७ असे गृहीत धरल्यास आकडा १७२ होतो आहे. बहुमताचा आकडा १४४ असून त्यानुसार भाजप कितीतरी पट पुढे असेल. शिंदे गट वगळता भाजपकडे स्वतःचे १०६ आणि २७ अपक्ष असे गृहीत धरल्यास १३३ असे संख्याबळ आहे. विधानसभेत उद्या बहुमत सिद्ध करताना जर एकनाथ शिंदे गट उपस्थितच राहिला नाही तर मविआ सरकार देखील स्वतःचे बहुमत सिद्ध करू शकणार नाही. त्या तुलनेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करता येऊ शकते असे तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, भाजप मोठा पक्ष ठरल्यावर सरकार स्थापनेप्रसंगी एकनाथ शिंदे गटाला सोबत घेतल्यास सत्तेत वाटा मिळू शकतो. अन्यथा शिंदे गट देखील एका बाजूलाच असेल. उद्याच्या निवडणुकीत शिवसेनेकडून अधिकृत व्हीप जारी केल्यावर शिंदे गटाने त्याविरुद्ध मतदान केल्यास पक्षविरोधी कारवाई त्यांच्यावर होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

हे देखील वाचा : एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच साधला निशाणा : संतापुन विचारला ‘हा’ प्रश्न

महाराष्ट्राच्या विधानसभेचे संख्याबळ २८८ आमदार आहेत. त्यापैकी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने हा आकडा २८७ झाला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी १४४ आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे ५३ आमदार आहेत. काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. शिवसेनेकडे ५५ आमदार आहेत. तिन्ही पक्षाच्या एकूण आमदारांची संख्या १५२ होते. त्याशिवाय महाविकास आघाडीला बच्चू कडू यांच्या दोन आमदारांनी आणि इतर अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. म्हणजे आघाडीला बविआच्या ३, सपाच्या २, पीजेपीच्या २ आणि पीडब्लूपीच्या एका आणि 8 अपक्षांचा पाठिंबा आहे. मात्र, आता खेळ बिघडला आहे. कारण शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केलं आहे. तर आघाडीच्या सर्व अपक्षांनी आणि प्रहारच्या दोन आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे केवळ १६ आमदार उरले आहेत.