⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला येणार जळगाव दौऱ्यावर ; असे आहे नियोजन

जळगाव लाईव्ह न्यूज | 31 जानेवारी 2024 | प्रशासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू असताना, त्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौ-यावर येत आहेत. ४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे. त्यांच्या हस्ते चोपडा शहरातील १०० कोटींच्या विकासकामांच्या उ‌द्घाटनासह ममुराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

प्रशासनाकडे अद्याप या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती आली नसली, तरी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबतची माहिती दिली आहे.

चोपडा शहरात अमृतअंतर्गत भुयारी गटार योजनेच्या कामाचे उ‌द्घाटन होणार आहे. ममुराबाद येथे ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी विमानतळ परिसरात नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित सभेच्या जागेची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती.

दोन्ही उपमुख्यमंत्रीही येणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हेही साहित्य संमेलनानिमित्त जळगाव दौयावर येणार आहेत. मात्र, अद्याप त्यांचाही अधिकृत दौरा जाहीर झालेला नाही. फडणवीस हे यावेळी नव्याने सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या पाडळसरे (निम्न तापी) प्रकल्पालाही भेट देण्याची शक्यता आहे.