मदतीच्या हजारो हातांच्या उपस्थितीत हेल्प फेअर-४ चा समारोप
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर -४ प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी जळगावकरांनी प्रचंड उत्साहाने आपला सहभाग नोंदवत सेवाकार्याच्या कुंभमेळ्याला निरोप दिला. या माध्यमातून सेवा आणि सदाचाराचा एक सोहळाच जणू जळगावकरांनी अनुभवला. कार्यक्रमाच्या समारोपात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, ऍड. ललिता पाटील, डॉ. केतकी पाटील, मिस मल्टीनॅशनल तन्वी मल्हारा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
यावर्षी हेल्प फेअर मध्ये एकूण ६० समाजसेवी संस्था व २६ सेवामहर्षी सहभागी झाले होते. स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच शासकीय योजनांची माहिती, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि हॉबी डूबी डू हा विभाग तसेच विविध समाजातील सेवामहर्षी व स्वच्छतादूतांचा सत्कार सारखे उपक्रम सोहळ्यात सामाविष्ट करण्यात आले होते. सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजाला समाजऋण फेडण्याचे नवनवे मार्ग दाखविणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, दातृत्व जगविणे, तरुण पिढीला सेवाकार्यात करियरच्या नवीन वाटा दाखविणे हि या आयोजनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रामुख्याने याच हेतूने या सोहळ्याची मांडणी करण्यात आलेली होती.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी सुरवातीला सर्व मान्यवरांनी सेवाभावी संस्थांच्या स्टॉल्सला भेट दिली व त्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांचे स्वागत देखील एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले होते. प्रथम घंटानाद करून त्यांना मंचावर बोलवण्यात आले, त्याचवेळी एलईडी स्क्रीनवर ज्येष्ठ सेवामूर्तींना देवाच्या स्वरूपात दाखवून मानवतेचा संदेश देण्यात आला. यानंतर सर्वांना हेल्प-फेअरचा परिचय देणारी फिल्म दाखवण्यात आली. गनी मेमन यांनी प्रस्तावना केली तर ज्योती यांनी सूत्रसंचालन केले. आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ज्यामध्ये एकूण स्वच्छतादूत, उत्कृष्ट सेवा संस्था व इतर अनेक पुस्कारांचे वितरण करण्यात आले. एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होते तर दुसरीकडे खाद्यजत्रेचा आनंद जळगावकरांनी लुटला. आलेल्या पाहुण्यांचा उत्साह पाहता हेल्प-फेअरला खरोखरच एका जत्रेचे स्वरूप मिळाले होते. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी हेल्प फेअर टीमच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले व पुढच्या वर्षी देखील मानवतेच्या या कुंभमेळ्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.
उत्कृष्ट सेवा संस्था व स्वच्छतादूतांचा सन्मान
निस्वार्थ भावनेने समाजाला समर्पित सेवाभावी संस्थांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व त्यातून इतरांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी हेल्प फेअर-४ मधील उत्कृष्ट सेवा संस्थांना पुरस्कार देण्यात आला. यामध्ये डॉ. हेगडेवार सेवा समिती, जनमानवता संस्था, पशूपापा संस्था, तसेच कोरोना काळात अविरत सेवा देणारे इंडियन रेडक्रॉस सोसायटी व गोदावरी फाऊंडेशन या संस्थांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर स्वच्छतेतून निरोगी समाज घडवणारे आनंद सपकाळे, अंजली कंडारे, भगवान कंडारे, कन्हैया लोंढे, संदीप बिऱ्हाडे यांना स्वच्छतादूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय हेल्प फेअर-४ साकारण्यासाठी परिश्रम घेणारे मोटेल कोझी कॉटेज, मनोज डोंगरे, निखिल शिंदे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
हेल्प फेअर म्हणजे तरुणांना नवी दिशा देणारा उपक्रम – विजय जाधव
समारोपीय दिवसाचे प्रमुख वक्ते मुंबई येथील समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सर्वांशी संवाद साधतांना आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. गरिबीतून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहणारे जाधव यांनी घरून पळून आलेल्या तरुणांसाठी एक संस्था सुरु केली. अश्या मुलांना गुन्हेगारी कडे न जाऊ देता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. तरुणांना प्रेरणा देणारे जाधव यांनी सांगितले की हेल्प फेअर सारखे उपक्रम समाजाला आणि विशेषतः तरुणाईला नवी दिशा देणारे आहे. हेल्प फेअर मध्ये तरुणांचा अधिकाधिक सहभाग असावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
यंदा हॉबी डुबी डू ठरले विशेष आकर्षण
मल्हार हेल्प फेअर मध्ये दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. त्याच अनुषंगाने यावर्षी रोजगार मेळावा, हॉबी डुबी डू चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध छंदवर्ग यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने हॉबी क्लासेस गॅलरी हा विशेष विभाग यावर्षी समाविष्ट करण्यात आला होता ज्यामध्ये कला, संगीत, नृत्य, विज्ञान, सारखे अनेक क्षेत्रातील क्लासेस सहभागी झाले होते.