⁠ 
शनिवार, मे 4, 2024

दलबदलू नगरसेवकांमुळे निष्ठावान नगरसेवकांना सहन करावा लागत आहे मनस्ताप

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये गेल्या दिड वर्षांपूर्वी अभूतपूर्व असं सत्ता परिवर्तन झालं. तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जळगाव मनपा मध्ये सत्ता परिवर्तन शक्य झालं. त्यावेळी भाजपाच्या तब्बल 27 नगरसेवकांनी फुटून शिवसेनेला समर्थन दिले होते. मात्र दिड वर्षातच संपूर्ण खेळ बिघडला आहे.आता शिंदे भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्री बनले आहेत. यामुळे त्यांच्या पाठोपाठी जळगाव मनपातील आठ नगरसेवकही गेले आहेत. मात्र आता गंमत अशी की या आठ पैकी काही नगरसेवक पुन्हा भाजपा मध्ये जाण्यास उत्सुक आहेत. या नगरसेवकांच्या दलबदलूपणामुळे जळगाव मनपातील सर्वच नगरसेवक नाराज झाले असून यांच्यामुळे संपूर्ण नगरसेवकांची शहरात प्रतिमा डागाळली जात आहे असे मनपातील सर्वपक्षीय नगरसेवक म्हणत आहेत.

अडीच वर्षापासून जळगाव शहरातील काही नगरसेवकांनी तब्बल तीन पक्ष बदलले आहेत. आधी ते भाजपातून शिवसेनेत आले शिवसेनेतून आता शिंदे गटात गेले आहेत. आणि या सर्वांमध्ये सर्वात हस्यास्पद बाब म्हणजे हे सर्व नगरसेवक पुन्हा भाजपा मध्ये जाण्यास उत्सुक आहेत. याबाबत कित्येकदा त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा देखील केली आहे. या सर्व नगरसेवकांना भाजपमध्ये पुन्हा घेऊ नये यासाठी स्थानिक नेते व नगरसेवक इच्छुक नसल्यामुळे पुन्हा त्यांना भाजपमध्ये जाता येत नाही अशी या नगरसेवकांची गोची झाली आहे.

परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या नगरसेवकांनी घेत असलेल्या अशा पक्षांतराच्या भूमिकेमुळे जळगाव शहरातील प्रत्येका नगरसेवकाकडे जळगाव शहरातील नागरिक संशयाने पाहत आहेत. कित्येकदा नगरसेवकांना नागरिकांचा रोश देखील ओढून घ्यावा लागत आहे. महापौर जयश्री महाजन या कित्येकदा जळगाव शहरात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नागरिक करत असलेल्या आंदोलन ठिकाणी जात असतात. त्या ठिकाणी स्थानिक नागरिक नगरसेवकांचे रोश हा महापौरांवर काढताना दिसतात.

प्रशासनाचेही काही वेगळे असं नाही. महानगरपालिका प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी किंबहुना त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच काम हे स्थानिक लोकप्रतिनवर म्हणजेच नगरसेवकांच असत. नगरसेवक घेत असलेल्या दलबदलूपणाच्या भूमिकेमुळे महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी देखील नगरसेवकांना गांभीर्याने घेत नाहीत. नगरसेवकांनी सांगितलेले काम जे लगेच व्हायला हवीत, मात्र त्याला दिरंगाई होते. शेवटी नगरसेवकांना आपली भूमिका ही महासभेत मांडावी लागते.

महासभेमध्ये नगरसेवक मोठ्या प्रमाणावर प्रशासनावर आरोप करतात मात्र या सगळ्यांमध्ये या काही नगरसेवकांमुळे सर्वच नगरसेवकांची प्रतिमा बदनाम झाली आहे. हे तितकच खरं. म्हणूनच की काय आपण बघतोय की आज संपूर्ण जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नगरसेवक नाव काढलं की कित्येकदा नागरिक अपसुप हसतात

या बाबत सर्वपक्षीय निष्ठावान नगरसेवकांशी चर्चा केली असता त्यांचे उत्तर असे होते

जनतेचा कौल हा अखेरचा कौल असतो. जनता ठरवते कोणाला नगरसेवक बनवायचं आणि कोणाला नगरसेवक बनवायचं नाही. अशावेळी एखाद्या पक्षामध्ये जर कोणत्याही नगरसेवकाची पिळवणूक होत असेल तर तो नगरसेवक पक्ष बदलतो ही मात्र एकदा पक्ष बदलला तर मान्य आहे. पण ज्या प्रकारे काही नगरसेवक मोठ्या प्रमाणावर पक्ष बदलत आहेत यामुळे याचा चुकीचा परिणाम नागरिकांमध्ये दिसत आहे.अशी प्रतिक्रिया शिवसेना जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी दिली.

याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ज्या प्रकारचे दलबदलूगिरी काही नगरसेवक करत आहेत. ती अतिशय चुकीची आहे. यामुळे नगरसेवकांची प्रतिमा मलिन होत आहे. कारण नसताना ते पुन्हा आमच्या पक्षात येऊ पाहत आहेत. मात्र एकदा आपण घर सोडलं की त्या घरात पुन्हा यायचं नसतं हे त्यांना ठाऊक नाही.

दुसरीकडे नगरसेवक अनंत (बंटी) जोशी यांच्याशी बोलले असता ते म्हणाले की, मी स्वतः पक्षामध्ये बदल केला नाही असं नाही. मात्र जेव्हाही मी पक्ष बदलला तो निवडणुकी अधि बदलला. जनतेला सामोरे गेलो निवडून आलो. मात्र निवडून आल्यावर मी एकदाही पक्ष बदललेला नाही. निवडून आल्यावर पक्ष बदलणं हे चुकीचे असून जनतेने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासावर आपण कायम राहत नाही.

याबाबत मनपा नगरसेवक प्रशांत नाईक यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, जळगाव शहरातील सर्वच नगरसेवकांनी पक्ष बदलले आहेत तर असं नाही. भाजपातल्या 30 नगरसेवकांनी तर शिवसेनेतल्या 15 नगरसेवकांनी आपला पक्ष बदललेला नाही. मात्र उरलेल्या २७ नगरसेवकांमुळे आज सर्व नगरसेवकांची प्रतिमा डागाळली आहे. यामुळे पक्षांमध्ये बदल करणे अतिशय चुकीची बाब आहे यामुळे स्वतः सोबत इतरांची प्रतिमा डागाळते.