खुशखबर.. आजपासून धावणार लोकमान्य टिळक टर्मीनस-शालीमार एक्सप्रेस
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर बंद असलेली लोकमान्य टिळक टर्मीनस-शालीमार एक्सप्रेस अखेर आज १२ जुलै पासून पुन्हा रुळावर आली आहे. तब्बल सव्वा दोन वर्षांनंतर ही गाडी सुरु होत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी मार्च २०२० मध्ये रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून लोकमान्य टिळक टर्मिनस-शालीमार (कोलकाता) म्हणजेच १८०२९ डाऊन आणि शालीमार-लोकमान्य टर्मीनस १८०३० अप अद्यापपावेतो सुरु झालेली नव्हतो. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. ही गाडी सुरू करण्याची कधीपासूनच मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमिवर, रेल्वे प्रशासनाने ही एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अनुषंगाने उद्या दिनांक १२ जुलैपासून शालीमार ते लोकमान्य टर्मीनस एक्सप्रेस सुरू होत आहे. तर एलटीटी ते शालीमार ही ट्रेन १४ जुलैपासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, वरणगाव आणि बोदवड या रेल्वे स्थानकांवर या दोन्ही ट्रेन्सला थांबा आहे. लोकमान्य टिळक टर्मीनसवरून रात्री १० वाजता सुटणारी ही ट्रेन सकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी जळगावला पोहचते. तर दुसर्या मार्गाचा विचार केला असता जळगाव येथून रात्री ८ वाजून ५८ मिनिटांनी येणारी ही ट्रेन सकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी लोकमान्य टर्मीनसला पोहचते.