जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । ग्रामीण दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील १ हजार ९३५ स्वयंसहाय्यता गटांकडे ३२ कोटी ३१ लाख ९७ हजार रुपयांचे कर्ज प्रलंबित आहे. एकूण कर्ज वाटपापैकी केवळ ४० स्वयंसहाय्यता गटांनी कर्ज परतफेड केली.
अभियानांतर्गत दारिद्र्य रेषेखालील स्वयंसहाय्यता गटांना खेळते भांडवल पहिले, दुसरे व तिसरे, चवथे व्यवसाय कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. पात्र बचत गटांना १० ते १५ हजार रुपयांच्या मर्यादेत खेळते भांडवल अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. बँकेचे खेळते भांडवल कर्ज किंवा व्यवसाय कर्ज घेऊन फेड केलेली आहे किंवा परतफेड सुरु असलेल्या गटांना पुढील टप्प्यांचे अर्थसहाय्य देण्यात येते. १ ले अर्थसहाय्य गटाची स्थापना होऊन ६ महिने किंवा फिरता निधी मिळाल्यानंतर ३ महिन्यात सदर अर्थसहाय्य बँकेकडून देण्यात आले. पात्र गटांना प्राप्त गुणांनुसारच कर्ज देण्यात येते. या अर्थसहाय्यासाठी ६ ते १२ महिन्यात परतफेड करण्याची मुदत आहे. पहिले कर्ज परतफेड केल्यानंतर दुसरे अर्थसहाय्य देण्यात येते. या अर्थसहाय्य १२ ते २४ महिन्यात परतफेड करावयाचे आहे.
एकीकडे जिल्ह्यातील अनेक महिला गटांकडे करोडेंचे कर्ज प्रलंबित आहे तर दुसरीकडे महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. शासन आणि प्रशासन काय निर्णय घेणार यावर बचतगटांची पुढील मदार अवलंबून आहे.