जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२५ । जळगाव जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे उद्या २५ जून रोजी जळगाव जिल्ह्यात मद्य विक्री आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय मद्य असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.

यामागील कारण म्हणजे जळगाव-भुसावळ महामार्गावरील साकेगाव नजीक असलेल्या हॉटेल वरुण येथे बिलाच्या वादावरून १५ ते २० अज्ञात व्यक्तींनी हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांवर चाकू आणि बाटल्यांनी हल्ला केला. या घटनेने जिल्ह्यातील मद्यविक्री व्यवसायातील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी सकाळी घटनेचा निषेध करण्यासाठी मद्य विक्री आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान हॉटेल वरुण येथे झालेल्या हल्ल्यात जखमींना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या वेळेत राहणार बंद?
जिल्हा मद्य विक्री असोसिएशनची उद्या दि.२५ रोजी सकाळी १० वाजता हॉटेल सिल्वर पॅलेस येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीनंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. भुसावळ येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील मद्य विक्री करणाऱ्या सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.









