⁠ 
शनिवार, मे 4, 2024

कर्तव्यदक्षता : अपघातातील जखमीला उपचार देत वाचवले प्राण

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील तापी पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी हाेऊन बेशुद्ध पडलेल्या दुचाकीस्वारावर एका महिला डॉक्टरांनी प्रथमाेपचार करुन शुद्धीवर आणले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगावला हलवून त्यास जीवदान दिले. त्यांनी या कर्तव्यदक्षपणातून माणुसकीचे दर्शन घडवले.

अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री ८.०० वाजेच्या सुमारास कोळन्हावी येथील तापी पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एक तरुण दुचाकीस्वार गंभीर जखमी होवून बेशुद्ध पडला होता. त्याचवेळी जळगाव येथील कामे आटोपून किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन या किनगावकडे जात होत्या. त्यांना बेशुद्ध इसम दिसल्याने त्यांनी वाहन थांबवून रुग्णसेवा दिली. यात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गंभीर जखमीस सीपीआर देऊन शुद्धीवर आणले. आणि प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगावला पाठवले.

आमदारांनी ही केली मदत

यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनीही अपघातग्रस्तांना मदत केली. रुग्णांच्या नातेवाइकांनी अत्यंत भावनिक होत डॉ.महाजन यांचे आभार मानले. सध्याच्या धावपळीच्या युगात अशी रुग्णसेवा करणारे डॉक्टर पहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. डॉ.मनीषा महाजन यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जखमी इसम हा विदगाव येथील असून त्याचे नाव कळू शकले नाही. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.