⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

नेत्यांनो… एकमेकांच्या पोराबाळांवर टीका करण्यापेक्षा जळगावच्या विकासावर बोला!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगावच्या नेत्यांना अधून मधून वारे येते कि काय असाच प्रश्न सध्या पडू लागला आहे. एखादी निवडणूक जवळ आली किंवा चर्चेत राहण्याचा मुद्दा संपला कि आपले नेते एकमेकांवर शिंतोडे उडवितात. अलीकडे तर राजकारण इतक्या खालच्या पातळीवर पोहचले आहे कि थेट कुटुंबावर टीका होऊ लागली आहे. पन्नाशी ओलांडलेले दिग्गज नेतेच असे कुठेही बरळू लागले तर लहान्यांचा देखील संयम सुटणारच. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता जळगाव शहर आणि जिल्हा दिवसेंदिवस मागे पडत चालले असल्याची चिंता नेत्यांना शिल्लकच राहिली नसून असेच सुरु राहिले तर भविष्यात न नागरिक नेत्यांना विचारतील ना जळगाव शहर म्हणून नावारूपाला येईल.

जळगाव जिल्हा तसा कधीकाळी सर्वगुण संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जात होता. जळगावची सुवर्णनगरी म्हणून असलेली ओळख आजही कायम असली तरी केळी, कापूस, डाळ मील, जिनींग मील, उद्योग असे बरेच काही कधीतरी जळगाव जिल्ह्यात भरभरून होते. काळाच्या ओघात राजकारणी आपल्या विश्वात मश्गूल झाले आणि उत्पादकांचा तोटा वाढू लागल्याने त्यांनी आपला विस्तार कमी केला. उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नाशिक हेच दोन जिल्हे रेल्वे, महामार्ग आणि इतर दळणवळण सुविधांनी संपन्न होते. कुंभ मेळ्याने आजवर नाशिकला प्रत्येकवेळी भरभरून दिले असे म्हटले जात असले तरी तेथील राजकारण्यांनी शहराच्या विस्ताराचा अंदाज घेत प्रशस्त रस्ते, गटारी, उद्याने आणि इतर सुविधा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे.

जळगावात सर्व उलट आहे. विकास तर दूरच राहिला परंतु स्वतःचे खिशे भरण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शहर आणि जिल्ह्याचे वाटोळे केले. जळगाव शहरात आजवर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची सत्ता होती. जळगाव शहरातील व्यापारी संकुले, पाणी पुरवठा व्यवस्था, उद्याने असे बरेच काही त्यांनी केले. शहरातील रस्ते आणि सर्वात उंच मनपा इमारत देखील त्यांच्याच काळात उभारली गेली. जळगावात रस असलेला नेता जिल्ह्याच्या राजकारणात जाऊ लागला आणि सर्व बिनसले. विधान परिषद निवडणुकीत राज्याचे नेते एकनाथराव खडसे व सुरेश दादा जैन यांच्यातील दरी वाढली आणि पुढे शहराचे वाटोळेच होऊ लागले. दोन्ही नेत्यांचे शाब्दिक युद्ध देखील झाले परंतु कधीही त्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जात टीका केली नाही.

गेल्या ८ वर्षातील जळगाव शहर आणि जिल्हा लक्षात घेतला तर विकास कुठे हरवला हेच कळेना झाले आहे. नेते आपल्याच्या विश्वात हरवले असल्याने जळगावकरांच्या विकासाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच राहिला नाही. राज्याचे राजकारण हलविण्याची ताकद ठेवणारे पाच दिग्गज नेते विद्यमान मंत्री ना.गिरीश महाजन, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर आज जळगावात आहेत. आ.एकनाथराव खडसे विरुद्ध इतर नेते असे शाब्दिक युद्ध अनेकदा जळगावकरांनी पाहिले आहे. गुलाबराव देवकरांनी मात्र नेहमीच संयम दाखवला आहे. विशेषतः खडसेंनी भाजप सोडल्यावर तर टीका युद्ध वारंवार पाहायला मिळाले.

नेते एकमेकांवर प्रचंड टीका करीत असल्याचे सर्वांना माहिती असले तरी ऐन निवडणुकीच्या वेळी ते एकत्र आल्याचे दिसून आले. अनेकदा सर्वपक्षीय पॅनल तयार करून निवडणूक लढविण्याचे ठरले. आपसात कट्टर राजकीय वैरी असलेले नेते देखील तेव्हा एकमेकांसोबत प्रेमाने बोलू लागले. निवडणूक आटोपताच पुन्हा वैर ‘जैसे थे’ झाले. जिल्हा बँक निवडणुकीत तर हे सर्वांनी पाहिले. आता पुन्हा तोच कित्ता गिरवला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीपूर्वी नेत्यांच्या एकमेकांवर टीका सुरु झाल्या असल्या तरी सर्वपक्षीय पॅनलची देखील मागणी केली जात आहे.

नेत्यांच्या टीका तर आता राजकीय राहिल्या नसून वैयक्तीक पातळीवर येऊन पोहचल्या आहे. माजी मंत्री आ.एकनाथराव खडसेंनी मंत्री गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण, आ.चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलताना मालमत्तेच्या मुद्द्यावरून कौटुंबिक टीका केली. खडसेंची टीका कौटुंबिक असली तरी ती सर्वसामान्य भाषेतील होती. खडसेंच्या टीकेला आ.चव्हाण आणि आ.पाटील यांनी उत्तर दिले मात्र त्यात भाषा जशाच तशी पण जरा तरुणाई स्टाईलची होती. मंत्री गिरीश महाजनांवर टीका करताना खडसेंनी अनेकदा फर्दापूर प्रकरण आणि काही शेलक्या भाषेतील शब्द वापरले होते. नुकतेच खडसेंच्या एका वक्तव्याला उत्तर देताना महाजनांनी थेट मुलाच्या मृत्यूचे प्रकरण काढले. आजच्या जवळपास सर्वच नेत्यांनी कुटुंबावर टीका तर केलीच शिवाय त्यात भाषा कुठल्या कुठे वापरली.

राजकारणात कुटुंबाला ओढू नये असे म्हटले जाते परंतु आता कुटुंबाला ओढलेच जात नाही तर त्यांच्या इभ्रतीचे देखील शाब्दिक धिंडवडे काढले जात आहे. जळगावातील नेत्यांना एकमेकांवर टीका करून स्वतःला चर्चेत ठेवायची सवयच पडली असून त्याच विश्वात ते जळगावचे आपण पालक असल्याचे विसरले आहेत. एखाद्या कुटुंबातील पालक वाट भरकटला तर इतर लोक सांभाळून घेतात जळगावात तर सर्वच पालक वाट भरकटले आहेत. जिल्ह्याच्या विकासावर आणि शहराच्या परिस्थितीवर बोलायला कुणालाही वेळ नाही. जळगाव दिवसेंदिवस मागे पडत चालले असून कुणाचीही त्यासाठी तळमळ दिसून येत नाही. जळगावकरांनी तर आता अपेक्षाच सोडून दिली असून केवळ सुरु आहे, जगायचं म्हणून जगायचं असेच सर्व काही आहे.

जळगावकरांना देखील या नेत्यांची चीड यायला लागली असून कुठंही कट्ट्यावर नेत्यांच्या वक्तव्याचीच चर्चा ऐकायला येते. नेत्यांची टीका टिपण्णी पातळी घसरत चालली असल्याचे नागरिक जाहीर बोलू लागले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जळगावच्या विकासाचा पाया रचला गेला नाही तर नवख्यांना १०० टक्के चांगले दिवस येणार यात शंका नाही. आजवर नेत्यांना पर्याय नाही म्हणून मतदार त्यांनाच निवडून देत होते मात्र काही नवतरुण आता पुढे येऊ लागले असून राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, विविध जनसंपर्क यात्रा, सोशल मीडियाचा वाढत वापर यामुळे काहीतरी बदल जळगावकर करतील असे आज वाटू लागले आहे. बदल नाहीच झाला तर दिग्गजांना धक्का बसेल आणि त्यांना दखल घ्यावी लागेल हे मात्र निश्चित.