⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जमिनीच्या वादातुन लोखंडी वस्तूने डोक्यात वार; वडील व मुलगा गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। शेतीच्या सामाईक बांधावरून तालुक्यातील जुनवणे येथे सख्या चुलत भावांमध्ये वाद निर्माण झाला होता. वादातच सात जणांनी लोखंडी वस्तूने दोघांच्या डोक्यावर मारून रक्तबंबाळ केल्याची घटना रात्री दहाच्या सुमारास घडली. जुनवणे येथील मनोज मुखत्यारसिंग पाटील यांचे व त्यांच्या चुलत भाऊ काका काकू यांच्याशी शेतीच्या सामायिक बांधावरून वाद सुरू होते. रविवारी गावकऱ्यांनी त्यांच्यात समजोता घडवून आणला होता.

मात्र, २३ जुलैला रात्री दहाच्या सुमारास मनोज पाटील आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता अनिल श्यामसिंग पाटील, सुनील श्यामसिंग पाटील, त्यांचे मेव्हणे प्रवीण सुभाष पाटील, भूषण प्रवीण पाटील, प्रमोद सुनील पाटील आणि दोन अनोळखी इसम घरचा दरवाजा तोडून घरात घुसले. सुनील याने हातातील लोखंडी पासने मनोज यांचा मुलगा सागर याच्या डोक्यावर वार केला.

त्यानंतर अनिलने लोखंडी सळीने मारहाण केली. भांडण आवरायला गेल्यानंतर त्याने मनोजच्या डोक्यात जोराने सळीने मारहाण केली. तसेच मुखत्यारसिंग यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील सामानाची नासधूस केली. गावकऱ्यांनी भांडण आवरले. त्यानंतर मनोज आणि सागर याना जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तेथून त्यांना धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात जखमींचा जबाब घेतल्यानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात सातही जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संदेश पाटील तपास करीत आहेत.