जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएच-७५३ बी) चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या संपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार असून ज्यामुळे विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी संपादित करण्याची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच जारी केली आहे. त्यात गुजरातमधील ७, महाराष्ट्रात तळोदा तालुक्यातील १०, शहादा तालुक्यातील २८, शिरपूर तालुक्यातील ४०, चोपडा तालुक्यातील २४, यावल तालुक्यातील २३, रावेर तालुक्यातील २३, मुक्ताईनगर तालुक्यातील ५ आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमधील ३ गावांचा समावेश आहे.

शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींमुळे हा महामार्ग बरीच वर्षे रखडला. मात्र,संबंधितांशी संवाद साधून भूसंपादनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात सरकारला अखेर यश आले आहे. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनींच्या अधिग्रहणासाठी भूमी संपादन अधिनियम २०१३ चे कलम तीन (अ) अंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शेतकरी व नागरिकांच्या हरकती निकाली निघाल्याने आता प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळणार आहे.
हा महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी शिक्षण उद्योग पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना मोठा लाभ मिळणार आहे. दरम्यान, यावल तालुक्यातील फैजपूर विभागातील उपविभागीय तथा भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा ते बऱ्हाणपूर महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी यावल, फैजपूर, चिंचोली, कासारखेडे, डोणगाव, किनगाव खुर्द-बुद्रुक, गिरडगाव, वाघोदे, साकळी, वढोदे, शिरसाड, विरावली बुद्रुक, चितोडा, सांगवी बुद्रुक, हिंगोणे व हंबर्डी या गावांतील जमिनी संपादित केल्या जात आहेत.
या जमिनींवर कोणतेही नवीन बांधकाम, झाडतोड किंवा मालकी हक्कातील बदल करण्यास मनाई करण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत जमीनधारकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.






