‘कूस बदलताना’ने वाजली महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची घंटा
जळगाव लाईव्ह न्यूज । मनोज बिरहारी । महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा जळगाव केंद्राच्या प्राथमिक फेरी २०२१-२२ ला सोमवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर यांचे “कूस बदलताना” या नाटकाने स्पर्धेची घंटा वाजली.
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत २१ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. याप्रसंगी पहिल्या दिवशी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर यांचे “कूस बदलताना”हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे लेखन भगवान हिरे तसेच दिग्दर्शन नितीन देवरे यांनी केले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी खा.उन्मेष पाटील, आ.सुरेश भोळे, जेष्ठ नाट्यकर्मी शंभूअण्णा पाटील, विजय राठोड, अभिषेक पाटील, विनोद ढगे यांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून मीनाक्षी केंडे, किशोर दाऊ, ईश्वर जगताप यांनी काम पाहिले. जेष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील यांनी, नाट्यगृहावरील अतिरिक्त वीजबिल आणि भाडे यावर खंत व्यक्त केली. आ.सुरेश भोळे यांनी, नाटक कसे प्रेक्षकांना पाहायला मिळेल यासाठी जनतेची सेवा करणार आहे असे सांगितले. खा.उन्मेष पाटील यांनी, नाट्यकर्मीसाठी काम करणे गरजेचे असून नाटकाला जिवंत ठेवणे हे मोलाचे काम नाट्यकर्मी करत आहे. त्यांना हक्काचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत सर्व कलाकारांना खा.पाटील यांनी शुभेच्छा.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख चित्रफीत मार्फत हितगुज करताना म्हणाले की, नाटकातून येणारे विचार समाजासाठी योग्य दिशादर्शक ठरतील. गुणवंत कलाकार घडतील यात शंका नाही, असे म्हणून त्यांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रात १९ तर गोवा येथे १ अशा एकूण २० केंद्रावर नाट्य स्पर्धा सादर होत आहे. पन्नास टक्के क्षमतेने सोशल डिस्टनसिंगचे पालन करून प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. प्रास्ताविक दीपक पाटील यांनी तर सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले.