⁠ 
बुधवार, फेब्रुवारी 28, 2024

अभिमानास्पद : खान्देशच्या डॉक्टर दाम्पत्याला शार्क टँक इंडियामध्ये मिळाली ६० लाखांची फंडिंग

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ जानेवारी २०२३ | शार्क टँक इंडिया (Shark Tank India) हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पाहिला जाणारा रिअ‍ॅलिटी शो आहे. संपूर्ण भारताभरातून नव संकल्पना घेवून येणार्‍यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी येथे फंडिंग अर्थात गुंतवणूक मिळते. या शो मध्ये खान्देशच्या एका डॉक्टर दाम्पत्याला तब्बल ६० लाख रुपयांची फंडिंग मिळाली आहे. लघवीशी संबंधित विकार शोधण्यासाठी ‘पी-फ्लो’ हे अत्याधुनिक उपकरणाचा शोध त्यांनी लावला आहे. खान्देशातील हे पहिलेच स्टार्टअप किंवा कंपनी आहे ज्याला शार्क टँक इंडियामधून फंडिंग मिळाली आहे.

धुळे येथील प्रसिध्द डॉक्टर डॉ. आशिष रवंदळे आणि डॉ. प्रीती रवंदळे यांनी लघवीशी संबंधित विकार शोधण्यासाठी जगातील पहिली डिस्पोजेबल आणि पोर्टेबल यूरोफ्लोमेट्री प्रणाली शोधली आहे. ‘पी-फ्लो’ हे त्यांच्या स्टार्टअपचे नाव आहे. पारंपारिक पध्दतीने ही चाचणी करण्यासाठी प्रती चाचणी १ हजार रुपये खर्च येतो. मात्र पी-फ्लोच्या पोर्टेबल उपकरणाच्या मदतीने १ हजार रुपयांमध्ये तीन वेळा चाचण्या करता येतात. ही चाचणी घरच्या घरी करता येत असल्याने रुग्णांना अवघडल्यासारखे होत नाही. त्यांचे हे संशोधन भारतात वैद्यकीय क्रांती घडवू शकते. असा त्यांना विश्‍वास असून शार्क टँक इंडियामधील सर्व जजेस अर्थात शार्क यांनीही रवंदळे दाम्पत्याचे कौतूक केले आहे.

डॉ.आशिष हे दोन वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक आहे. प्रथम एका मूत्रपिंडातून १,७२, १५५ दगड काढण्यासाठी आणि दुसरे सर्वात मोठे मूत्रपिंड काढण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. डॉ.आशिष रावंदळे यांनी त्यांच्या वैद्यकीय पदव्यांची माहिती देतांना त्यांनी डेट्रॉईट येथील रोबो सर्जन कसे नाकारले आणि धुळे येथे परत आले आणि स्वतःचे २० खाटांचे युरोलॉजिस्ट केंद्र सुरू केले, जे २०१५ पर्यंत वाढून ११० खाटांचे झाले. त्यांची १२५ कोटी रुपयांची पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. याबद्दल सविस्तर माहिती दिली तेंव्हा सर्व शार्क अवाक् झाले. या डॉक्टर दाम्पत्याचा प्रवास पाहून बोटचे संस्थापक अमन गुप्ता डॉक्टरांचे कौतुक करतांना म्हणाले की, ‘डॉ साहब आप ने इतनी पढाई की, पेटंट करे, इनोवेशन करे, एमडी भी हो, पब्लिक लिस्ट कंपनी भी चला रहे हो, क्या क्या करते हो कमाल हो यार. आप पुरुष तो नही महापुरुष हो महापुरुष हो.’ यानंतर एमक्योर फार्मास्युटिकल्सचे कार्यकारी संचालक नमिता थापर व कार देखो चे संस्थापक आणि सीईओ अमित जैन यांनी ६% इक्विटीसाठी ६० लाख रुपयांमध्ये करार केला.

https://youtube.com/watch?v=hxjjh4n0G2Q