Khandesh Weather Update | जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । लहरी निसर्गाचा सध्या काही नेम नसून वातावरण केव्हाही बदलत आहे. गेल्या महिन्याभरापासून तापमान ४० अंशाच्या जवळपास असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान, आजपासून खान्देश, नाशिकसह कोकण आणि राज्यातील काही जिल्ह्यात विजेच्या कडाकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आजपासून पुढील ५ दिवस म्हणजे दि.८ एप्रिल पर्यंत मुंबई ठाणेसह संपूर्ण कोकण, नाशिक, खान्देश, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच आज व उद्या ४, ५ रोजी नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी वीज गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात सध्या कापूस, मका, ज्वारी, बाजरी, दादर तर नाशिकला द्राक्षे व कांदा काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी त्यासंबंधी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सध्या तरी अशी शक्यता असून काही बदल जाणवल्यास कळविले जाईल असे देखील खुळे यांनी सांगितले आहे.