⁠ 
शनिवार, मे 4, 2024

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत फिरती विज्ञान प्रयोगशाळा सज्ज

जळगाव लाईव्ह न्यूज| २२ ऑगस्ट २०२३। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत विज्ञान विषय लोकप्रिय करणारी फिरती विज्ञान प्रयोगशाळा (मोबाईल व्हॅन) आता सज्ज झाली आहे. या व्हॅनमधील विज्ञानाचे प्रयोग शालेय विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी विद्यापीठातील १६ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची टीम तयार करण्यात आली आहे.

२०११ मध्ये विद्यापीठाने विज्ञान प्रयोगशाळा असलेली मोबाईल व्हॅन खरेदी केली. या व्हॅनमध्ये विविध प्रकारचे २४ विज्ञान प्रयोग आहेत. मध्यंतरी ही व्हॅन नादुरुस्त होती. आता कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी यांनी स्वत: लक्ष घालून ही व्हॅन पुन्हा एकदा सज्ज केली आहे. विद्यापीठात राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे केंद्र आहे. या केंद्राचे समन्वयक डॉ. एस. एस. घोष यांच्यावर मोबाईल व्हॅनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या व्हॅनमध्ये असलेल्या २४ विज्ञान प्रयोगामध्ये आता जैवशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र आदी अभ्यासक्रमांच्या काही प्रयोगांची भर टाकून ३० विज्ञान प्रयोग करण्यात आले आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार असे तीन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या ग्रामीण आणि दुर्गम भागात शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मागणीप्रमाणे ही मोबाईल व्हॅन पोचवली जाणार आहे.

या व्हॅनमधील विज्ञान प्रयोगांची माहिती शालेय विद्यार्थ्यांना देण्यासाठी विद्यापीठाने प्रशाळांमधील १६ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची निवड केली आहे.या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मानधन दिले जाणार आहे.

निवड झालेल्या या १६ विद्यार्थ्यांना शनिवारी एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाचे उद्‌घाटन कुलगुरु प्रा. माहेश्‍वरी यांच्या हस्ते झाले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची लोकप्रियता व्हावी यासाठी ही व्हॅन कार्यरत राहील. निवड झालेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समाजाचे काही देणे फेडण्याची संधी यामधून प्राप्त होणार आहे. येत्या वर्षभरात ३ हजार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हॅन पोचती करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याची माहिती कुलगुरुंनी या वेळी दिली.

समन्वयक प्रा. एस. एस. घोष यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जे. व्ही. साळी, डॉ. अमरदीप पाटील, डॉ. राजू आमले, डॉ. नवीन दंदी, एम. एस. नेतकर, जलपाल बंगे आदी उपस्थित होते. शनिवारी केंद्रीय विद्यालयात ही मोबाईल व्हॅन विद्यार्थ्यांना बघण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली.