कानबाई : खान्देशातील दिवाळी इतकाच महत्वाचा सण; सविस्तर जाणून घ्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२१ । श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे.
कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तुझ्या नावाची म्हणजे “खानबाई’ साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश – कान्हादेश. खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी ‘कानबाई’ हे नाव घेतलं असावं. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो. या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन (तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते.
कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते. ‘कानबाई परनुन आणणे’- पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही. अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा.
आता चाळीसगावजवळ उमरखेडला कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात. तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेऊन तिची स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र इत्यादी चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं (ही कणीक पण खास पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.
दुसऱ्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलशने आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात.
पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काश्याच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट (म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं. रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात. कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे. या व्रताचे पूजनाचे आदित्यराणू बाईच्या व्रताशी साधर्म्य आहे. श्रावण महिना हा सूर्य उपासनेसाठी श्रेष्ठ मानला जातो हे व्रत रविबल वाढण्यासाठी केले जाते.
#संकलित माहितीच्या आधारावर दिलेले वृत्त