मोठी कारवाई ! एमडी ड्रग्स आरोपीवर बुलडोझर अ‍ॅक्शन! दोन दुकाने जमीनदोस्त

जून 8, 2026 10:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात गाजत असलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणातील अटकेत असलेल्या एका संशयित आरोपीच्या घरावरील अतिक्रमणावर महानगरपालिकेने बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

New Project 1 2

एमडी ड्रग्स प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत. अटकेत असलेल्या संशयित आरोपी रईस देशमुख याच्या सुप्रीम कॉलनी परिसरातील घरासमोरील अतिक्रमित बांधकामावर महानगरपालिका आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. या मोहिमेत अतिक्रमणाखाली उभारण्यात आलेली दोन दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली. सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले होते.

महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्याबाबत एमआयडीसी पोलिसांकडून अतिक्रमण विभागाला पत्र प्राप्त झाले होते. त्यानंतर संबंधित बांधकामाची पडताळणी करून नियमानुसार ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींच्या मालमत्तांवरील अतिक्रमणाचीही तपासणी सुरू असून नियमबाह्य बांधकाम आढळल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी अशाच धडक कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now