जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । एरंडोल शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २४ ते २८ मार्च दरम्यान पाच दिवस कडकडीत बंदचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यानुसार बुधवारी (ता. २४ ) बंदचा पहिला दिवस यशस्वी झाल्याचे चित्र आहे. संपूर्ण शहरात कडकडीत बंद दिसून आला. बंदला नागरिक, व्यापारी आदी सर्व घटकांपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासून पोलिस, पालिका कर्मचारी , होमगार्ड प्रशासनाने रस्त्यावर फिरणाऱ्यावर करडी नजर ठेवली होती.
येथे प्रशासनाने आजपासून पाच दिवस जनता कर्फ्यु पुकारला. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वयंस्फूर्तीने सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून प्रशासनाला सहकार्य केले. एरंडोल येथे कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ही शृंखला खंडित व्हावी म्हणून महसूल, पोलीस आणि नगर परिषद, होमगार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसांचा जनता कर्फ्यु पुकारला गेला आहे. जनजागृतीसाठी फ्लॅग मार्चकालच संध्याकाळी संपूर्ण शहरात बुधवार दरवाजा, भगवा चौक, मारवाडी गल्ली,आर टी काबरे स्कूल मार्गे जनजागृतीपर फ्लॅग मार्च काढून नागरिकांना पाच दिवसांच्या दुकान उघडे ठेवू नये असे आवाहन केले.
आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, विनाकारण कोणी बाहेर फिरू नये , अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. फ्लॅग मार्चमध्ये प्रांताधिकारी विनय गोसावी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, नगर पालिका चे हितेश जोगी, अनिल महाजन, पोलिस स्टेशन चे कर्मचारी होते.त्याचाच परिणाम म्हणून आज संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाहायला मिळाला.