IAS अधिकारी म्हणून जामनेरच्या तरुणाची हिंगोलीत ‘भामटेगिरी’

जळगाव लाईव्ह न्यूज | १७ फेब्रुवारी २०२३ | ‘स्पेशल २६’ या हिंदी चित्रपटात तोतया सीबीआय अधिकारी बनून लोकांना लुटणारी टोळी आपण पाहिली आहेच. मी पोलीस आहे, इन्कमटॅक्स अधिकारी आहे, मंत्र्यांचा पीए आहे, अशा थापा मारुन अनेकांना गंडा घालण्याच्या बातम्या अधून मधून वाचण्यात येतातच. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला आहे. यात एका भामट्या तरुणाने ‘मी IAS अधिकारी असून सध्या परीविक्षाधीन काळात अतिरिक्त जिल्हा अधिकारी पदावर कार्यरत आहे.’ अशा थापा मारत हिंगोली जिल्ह्यात केलेले उपद्व्याप समोर आले आहेत. हा तरुण जामनेर येथील रहिवासी आहे. अमोल वासुदेव पजई (वय ३२) असे या तोतया अधिकार्‍याचे नाव असून त्याच्या विरुध्द १६ फेब्रुवारी रोजी हिंगोली जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये जामनेर येथील अमोल वासुदेव पजई (वय ३२) हा हिंगोलीत गेला. त्याने अनंता मधुकर कलोरे (वय ४२, रा. मोठी उमरी, ता. जि. अकोला) व संदीप ऊर्फ इंद्रजित एकनाथ पाचमाशे (वय ३४, रा. सुराणानगर, हिंगोली) यांच्या मदतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असल्याचे भासवून पोदार शाळेत दोन मुलांचे अ‍ॅडमिशनही करून घेतले. तर मुलांच्या फॉर्ममध्येही हे पद नमूद केले. एका आयएएस अधिकार्‍याची मुलं आपल्या शाळेत शिकत असल्याने शाळेने त्यास प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले. त्या पठ्ठ्याने तेथे जावून भाषणही ठोकले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी अमोल पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांना भेटला त्यांनाही त्याने २०२० बॅचचा IAS अधिकारी असल्याचे सांगितले. मात्र पोलीस अधिक्षकांना शंका आल्याने त्यांनी २०२०च्या बॅचची यादी तपासली व त्या नंतर अमोलचे बिंग फुटले.

अमोलचे बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करत अमोलच्या महागडी चारचाकी गाडीची तपासणी केली असता त्यात हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेटर पॅड, एनटीसीतील अर्बन बँकेची कागदपत्रे, भाडे करायचे बाँड, पत्नीचे ओळखपत्रही आढळले. या ओळखपत्रावर गृह मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडियन मिनीस्ट्री ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट, तसेच नाव व फॉरेस्ट रेंज ऑफिसर अशी संशयित कागदपत्रे आढळली. या गाडीत तब्बल पाच लाखांची रोकडही आढळली आहे. पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी, पोदार शाळेची फसवणूक केल्याचे प्राचार्य विनय उपाध्याय यांनी हिंगोली शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दरम्यान अमोल पजई, आनंता कलोरे व संदीप पाचमाशे या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे.