जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत मारुतीच्या दर्शनासाठी जाताना दोघा चुलत भावांवर काळाने घाला घातला आहे. जामनेर तालुक्यातील मालदाभाडी नजीक वाडी किल्ल्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघा चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. कल्पेश समाधान माळी (१७) आणि शुभम भिका माळी (२१, दोघे रा. पाळधी ता. जामनेर) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

दोघे चुलत भाऊ शनिवारी सकाळी चार वाजता शिरसाळा येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी पाळधी येथून निघाले. बोदवडकडे जात असताना मालदाभाडी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दोघे जण रस्त्याच्या कडेला खोल नाल्यात पडले. त्यांना गळा व डोक्याला जबर मार लागला.

दोघेही गंभीर जखमी अवस्थेत तिथेच पडून होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास घरातील काही जण व गल्लीतील तरुण त्यांना शोधण्यासाठी निघाले. त्यावेळी वाडी किल्ल्याजवळ रस्त्यावर त्याची दुचाकी आणि दोघे तरुण मृतावस्थेत आढळून आले. रात्री ९ वाजेच्या दोघा भावांवर एकाचवेळी अत्यसंस्कार करण्यात आले.









