जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । नुकतेच संकटमोचक गिरीश महाजन यांना जळगाव महापालिकेत जोरदार धक्का मिळाला आहे. अशातच आता भाजपच्या हातातून महापालिके पाठोपाठ जिल्हा परिषदेतही जाण्याचे संकेत मिळत आहे.
जिल्हा परिषदेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे स्थानिक राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे समीकरण जुळून आले. हेच समीकरण आता राज्यातील बहुतांश महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये जुळवुन भाजपाला दे धक्का दिला जात आहे. गेल्या १८ मार्च रोजी जळगाव शहर महापालिकेत भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. यामुळे गिरीश महाजनांना मोठ्या नाचक्कीला सामोरे जावे लागले होते.
महापालिकेनंतर एकनाथ खडसेंनी मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळविला आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही सत्तांतर होऊ शकते. त्या अनुषंगाने आज काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्टवादीचे गटनेते शशीकांत साळुंखे, शिवसेनचे गटनेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपगटनेते रविंद्र पाटील यांनी एकनाथराव खडसे यांची मुक्ताई या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी आ.गुरुमुख जगवाणी, अशोक लाडवंजारी, अशोक पाटील, सुनील माळी, डॉ. अभिषेक ठाकुर, गोटु चौधरी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्तांतराविषयी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता बहुमतासाठी ३३ ही सदस्य लागणार आहेत. भाजपाचे ३२ सदस्य आहेत. तर या ३२ मध्येही एकनाथराव खडसे यांचे ११ समर्थक आहेत. हे समर्थक फुटल्यास जिल्हा परिषदेतही भाजपाची सत्ता जाऊ शकते.