जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२४ । जळगाव शहरातील अयोध्या नगरात राहणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. नोकरी मिळत नसल्याने तणावात असलेल्या तरुणाने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलेश सुरेश सोनवणे (२५, रा. अयोध्या नगर) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,’ असा भावनिक उल्लेखही त्याने त्यात केला आहे.
पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झालेला नीलेश सोनवणे हा तरुण आई-वडील व मोठ्या भावासह अयोध्यानगरात राहत होता. त्याने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केला होता. परंतू नोकरी मिळत नसल्याने काही दिवसांपासून तो तणावात होता. मंगळवारी (९ जुलै) त्याचे आई-वडील व भाऊ हे सर्व इगतपुरी येथे लग्नाला गेले होते. त्यामुळे नीलेश हा घरी एकटाच होता. त्यावेळी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
रात्री १० वाजता त्याचे मित्र घरी पोहचले त्या वेळी नीलेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी याविषयी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आई-वडील व मोठा भाऊ रुग्णालयात पोहचले. नीलेशचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकों अतुल पाटील करीत आहेत.